देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण केलं. या भाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. यासोबचत त्यांनी आणीबाणीचा उल्लेखही केला. आपल्या भाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आणीबाणीला देशाच्या इतिहासातील ‘काळा अध्याय’ असं म्हटलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवार, २७ जून रोजी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला संविधानावरील सर्वात मोठा हल्ला म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून आणीबाणीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याची काम सत्ताधारी पक्षांकडून सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आणीबाणीचा ‘काळा दिवस’ म्हणून उल्लेख केला.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण केलं. यावेळी त्यांनी आणीबाणीला झालेल्या ५० वर्षांच्या निमित्ताने त्यावर अभिभाषणात भाष्य केलं. “जेव्हा संविधान तयार होत होतं, तेव्हाही जगात असे गट होते जे भारताच्या अपयशी होण्याची इच्छा व्यक्त करत होते. देशात संविधान लागू झाल्यानंतरही संविधानावर अनेकदा हल्ले झाले आहेत. २५ जून १९७५ ला लागू झालेली आणीबाणी ही संविधानावरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता,” असा प्रहार राष्ट्रपती मुर्मू यांनी केला आहे.
“आणीबाणीच्या काळात देश अराजकतेत बुडाला होता. पण, अशा असंवैधानिक ताकदींवर देशाने विजय मिळवून दाखवला. कारण भारताचा पाया लोकशाही परंपरेचा आहे. लोकशाहीला कलंकित करण्याच्या प्रयत्नांचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे,” अशी ठाम भूमिका द्रौपदी मुर्मू यांनी मांडली. फुटीरतावादी शक्ती लोकशाही कमकुवत करण्याचा आणि देशाच्या आतून बाहेरून समाजात दरी निर्माण करण्याचा कट रचत आहेत,” असेही राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.
देशाच्या प्रगतीवर अभिमान वाटायला हवा- राष्ट्रपती मुर्मू
“आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरलो तर याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जर भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. भारताने हिंसाचार आणि अराजकता न ठेवता एवढ्या मोठ्या निवडणुका घेतल्या तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. भारतातील जनतेने नेहमीच लोकशाहीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. सुदृढ लोकशाही टिकवायची असेल तर हा विश्वास जपला पाहिजे. त्याचे संरक्षणही करावे लागते. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की लोकशाही संस्थांच्या विश्वासाला धक्का लावणे म्हणजे आपण सर्वजण ज्या फांदीवर बसतो ती फांदी तोडण्यासारखे आहे,” असं द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
हे ही वाचा:
मद्य धोरण तातडीने मंजूर व्हावे, अशी केजरीवालांची इच्छा होती
रेल्वेमधील वरची सीट अंगावर पडल्याने केरळमधील व्यक्तीचा मृत्यू
पंतप्रधान मोदी यांचा मुलाखतीतील दावा ठरला खरा
राऊत म्हणतात, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा
पेपर फुटीची होणार निष्पक्ष चौकशी
राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणात पेपर फुटीचा देखील उल्लेख केला. “सरकारी भरती असो की परीक्षा, कोणत्याही कारणाने परीक्षा खंडित होत असतील तर ते योग्य नाही. यामध्ये शुद्धता आणि पारदर्शकता खूप महत्त्वाची आहे. काही परीक्षांमधील पेपरफुटीच्या अलीकडील घटनांची निष्पक्षपणे चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे,” असा विश्वास द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.