पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा

पाच राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमांची थोड्याचवेळात घोषणा

उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तराखंड या पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम थोड्याचवेळात जाहीर होणार आहे. दुपारी ३.३० वाजता राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या कार्यक्रमाची घोषणा होईल.

पाच राज्यांतील स्थितीचा आढावा निवडणूक आयोगाने घेतला असून त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यापैकी उत्तर प्रदेश हे सर्वात मोठे राज्य आहे. त्यामुळे त्यातील निवडणुका या विविध टप्प्यांत घ्याव्या लागणार आहेत. त्यात जवळपास ८ टप्प्यात होतील असा अंदाज आहे. तर पंजाबचीही खूप चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला झालेला अडथळा देशभरात चर्चेचा विषय बनलेला असताना पंजाबची निवडणूक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तिथे तीन टप्प्यात निवडणूक होईल, असे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारचा कार्यकाळ मे २०२२मध्ये संपणार आहे तर उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूर या राज्यांतील विधानसभांचा कार्यकाळ मार्च २०२२मध्ये संपणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होऊ शकेल.

हे ही वाचा:

आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी

… म्हणून सोनू सूदने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’पद सोडले

भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा

‘ठाकरे सरकारचे कोविड सेंटर घोटाळे दहा दिवसांत बाहेर काढणार’

 

सध्या ओमिक्रॉनची भीती देशभरात आणि एकूणच जगभरात आहे. रुग्णांची संख्याही वाढते आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोना नियमांचे पालन करून या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. प्रचारसभा, मतदान यासंदर्भात काही वेगळी नियमावली तयार केली जाऊ शकते.

२०१७मध्ये फेब्रुवारी मार्च दरम्यान निवडणुका पार पडल्या होत्या. यावेळीही निवडणुका कधी संपणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. लसीकरणाचा मुद्दाही निवडणुकांच्या निमित्ताने चर्चेला येईल.

Exit mobile version