समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांची मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. १० फेब्रुवारीपासून सुरू होणार्या निवडणुका ७ मार्चपर्यंत चालणार आहेत. हे सात टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र, कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता रॅली आणि रोड शो आयोजित करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत रस्त्यावरील गर्दी, सायकल रॅली, पदयात्रा यासारख्या गोष्टींवर बंदी असेल, असे म्हटले आहे. यासोबतच डिजिटल रॅलींना प्रोत्साहन द्यायला हवे, असे आयोगाने म्हटले आहे. या निर्णयावर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुकांची भूमी बनवावी. यासोबतच आयोगाने सर्व पक्षांसाठी समान नियम बनवावेत. ते म्हणाले की, या निवडणुका कोरोनाच्या काळात होत आहेत. निवडणूक आयोगाला व्हर्च्युअल रॅली काढायची असेल, तर ज्या पक्षांची संख्या फारच कमी आहे आणि ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा नाहीत, त्यांचाही विचार करायला हवा.
व्हर्च्युअल रॅलीत भाजप मजबूत
निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांना टीव्हीवर अधिक वेळ द्यावा. कारण भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांच्याशी स्पर्धा करू शकत नाही. म्हणूनच निवडणूक आयोगाने सरकारडून राजकीय पक्षांना काही निधी मिळवून द्यावा. अशी मागणी अखिलेश यादव यांनी केली आहे.
हे ही वाचा:
बापरे!! म्हणून त्याने ११ वेळा घेतली कोरोना प्रतिबंधक लस
कौतुक करताना न थकणारे संजय राऊत ममतांवर रुसले!
पाकिस्तानातील मुरी येथे बर्फवृष्टीमुळे वाहनांत अडकून पर्यटक मृत्युमुखी
नाट्यसंगीत गायक पंडित रामदास कामत यांचे निधन
उत्तर प्रदेशातील निवडणुकीची घोषणा होताच भाजपने पुन्हा एकदा विजयाचे दावे करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “भारतीय निवडणूक आयोगाने देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशने गेल्या पाच वर्षांत परिवर्तन आणि विकासाच्या नव्या मार्गावर वाटचाल केली आहे. १० मार्चला निर्णय आल्यावर पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन होणार आहे.