देशातला वाढत चाललेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराच्या संदर्भातील मोठा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. पश्चिम बंगालमधील रोड शो, तसेच बाईक, कार अथवा सायकल रॅलीवर बंदी घालण्यात आली आहे. तर प्रचार सभांमधील नागरिकांच्या संख्येवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. दररोज कोरोना रुग्णसंख्या वाढीचा विस्फोट होत आहे. दिवसागणिक देशातील लाखो नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. अशा परिस्थितीत देशात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. महाराष्ट्रासारख्या काही राज्यात तर लॉकडाऊन लावायची परिस्थिती उद्भवली आहे.
हे ही वाचा:
रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला सर्वाधिक कोटा, पण ठाकरे सरकारचे रडगाणे सुरूच!
लस निर्यातीवरून प्रियांकांचे किळसवाणे राजकारण
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास उभारणार ऑक्सिजन प्लॅन्ट
मोदी सरकारवर टीका ही तर मजबूरी
याच कोरोनाच्या सावटात देशातील पाच विधानसभांच्या निवडणुका आल्या. यापैकी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरवार, २२ एप्रिल रोजी झाले असून अजून दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. पण देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने प्रचारावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंगालमधील राजकीय पक्षांचे रोड शो तसेच बाईक, कार, सायकल रॅलीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तर राजकीय सभांसाठी ५०० माणसांची मर्यादा असणार आहे.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोरोना परिस्थिती लक्षात घेता २३ एप्रिल रोजी बंगालमधे होणाऱ्या त्यांच्या सभा रद्द केल्या आहेत. गुरुवारच्या आकडेवारीनुसार बंगालमध्ये ११,९४८ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ५६ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.