भारतात होऊ घातलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील अरोरा यांनी या पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकांचे वेळापत्रक आणि नियमावली जाहीर केली. चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात या निवडणूका होणार आहेत.
केरळ, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू या राज्यांच्या तर पुदुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या निवडणूका होणार आहेत. देशातील कोविड परिस्थिती लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेऊन या निवडणूक पार पडतील. या निवडणुकांसाठीची आचारसंहिता ही आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर ताबडतोब लागू झाली आहे. दक्षिणेकडच्या दोन राज्यांचे म्हणजेच तामिळनाडू आणि केरळचे मतदान ६ एप्रिल रोजी होणार आहे तर तिथलाच केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या पुदुचेरीतही ६ एप्रिल रोजीच मतदान होईल.
आसाममध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. २७ मार्च, १ एप्रिल, आणि ६ एप्रिल या तीन दिवशी आसाम मध्ये मतदान होणार आहे. तर साऱ्या देशाच्या नजरा लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूका आठ टप्प्यांमध्ये होणार आहेत. २७ मार्च, १ एप्रिल, ६ एप्रिल, १० एप्रिल, १७ एप्रिल, २२ एप्रिल, २६ एप्रिल, २९ एप्रिल अशा ८ दिवशी बंगालमध्ये मतदान होईल.
या पाचही विधानसभा निवडणुकांची मतमोजणी २ मे रोजी होऊन निकाल जाहीर होतील. या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता निवडणुकांच्या आखाड्यात बाजी कोण मारणार हे २ मे रोजीच कळेल.