शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना नाव निवडणूक आयोगाने गोठविल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने तीन चिन्ह आणि तीन नावे दिली होती. त्यावर सोमवारी निर्णय झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना आता नवी नावे देण्यात आली आहेत.
उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे. मात्र चिन्हासाठी त्यांच्याकडून तीन पर्याय मागविण्यात आले आहेत.
धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही निवडणूक आयोगाकडून गोठविण्यात आल्यानंतर दोन्ही गटांनी नाव आणि चिन्हांचे पर्याय दिले होते. पण त्यापैकी त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे पर्याय दोन्ही गटांनी दिल्यामुळे ते आयोगाकडून नाकरण्यात आले. त्यातील तिसरा पर्याय जो उद्धव ठाकरे गटाने दिला होता, तो मशाल हा पर्याय निवडण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी तिसरे चिन्ह गदा पाठविले होते पण धार्मिक चिन्हे वापरता येणार नाहीत, असा नियम असल्यामुळे हे चिन्ह नाकारण्यात आले.
हे ही वाचा:
विकास हवा असल्यास प्रकल्पांना विरोध नको
‘शिवसेना’ नाव प्रबोधनकारांनी ठेवले की आचार्य अत्रेंनी?
पुरग्रस्तांना वाचवणारी नाव उलटून ७६ जणांचा मृत्यू
आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात
एकनाथ शिंदे यांच्या गटाला मात्र आता चिन्हांसाठी तीन वेगळे पर्याय देण्यास सांगण्यात आले आहेत. त्यातून त्यांना नवे चिन्ह मिळू शकेल. उद्या सकाळी १० वाजेपर्यंत त्यांना हे तीन पर्याय आयोगाकडे सुपूर्द करायचे आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर धनुष्यबाण हे चिन्ह आमचेच असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. निवडणूक आयोगाने अखेर हे चिन्ह आणि नाव गोठवले होते.