राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मानले जाणारे देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश मध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा पार पडत आहे. ४०३ जागा असलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील ५५ मतदारसंघात आज मतदान होणार आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्यानंतर आजही मोठ्या प्रमाणात मतदानाला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उत्तर प्रदेश मधील सहारनपुर, बिजनोर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शहाजहानपूर अशा नऊ जिल्ह्यात हे मतदान पार पडणार आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात ५५ जागांसाठी ५८६ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तर त्यांचे भवितव्य २ कोटी २ लाख मतदारांच्या हातात असणार आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये पुष्कर ठरणार Fire?
एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा
उत्तराखंड, गोव्यासाठी मतदार देणार कौल! उत्तर प्रदेशमध्येही होणार मतदान
१० फेब्रुवारी पासून उत्तर प्रदेश मधील विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून एकूण सात टप्प्यात मतदान पार पडणार आहे. राज्यातील ४०३ जागांसाठी मतदान होणार असून यापैकी मतदानाचा पहिला टप्पा १० फेब्रुवारी रोजी संपन्न झाला आहे. तर दुसरा टप्पा आज पूर्ण होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडेल. यावेळी कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच मतदान पार पडणार आहे. तर दहा मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे
लोकशाहीचा हा उत्सव सुरळीतपणे पार पडावा यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे. या ५५ विधानसभा क्षेत्रांमध्ये मिळून एकूण ६८६० पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तैनात असणार आहेत. तर त्यांच्या समवेत ५४६७० पोलीस हवालदार, ४३३९७ होमगार्ड, ९३० पीआरडी जवान तर ७७४६ ग्राम चौकीदार असणार आहेत.