दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा कुठे होणार यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिंदेंचा अर्ज स्वीकारला, ठाकरेंचा अर्ज फेटाळला

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा कुठे होणार यावरून सध्या रस्सीखेच सुरू आहे. दसरा मेळाव्यासाठी दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी अद्याप कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. असे असताना वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून अर्ज करण्यात आला होता. हा अर्ज आता स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

गेली अनेक वर्षे नियमितपणे शिवसेनेतर्फे छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येतो. मात्र, यंदा शिवसेनेत उभी फूट पडलेली असताना छत्रपती शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी दोन्ही गटांकडून अर्ज करण्यात आले आहेत, परंतु शिवाजी पार्क मैदान कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्याकडे वांद्रे- कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा पर्याय असणार आहे. मात्र, उद्धव ठाकरेंकडून ज्या मैदानाची परवानगी मागण्यात आली आहे ते मैदान पूर्वीपासूनच आरक्षित असल्याने त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बाजूने केलेला अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या बाजूने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी पार्क मैदान दोन्ही गटांना नाकारण्यात आलं तर एकनाथ शिंदेंकडे ‘बीकेसी’चा पर्याय उपलब्ध असणार आहे.

हे ही वाचा:

अमित शहांच्या ताफ्यासमोर टीआरएस नेत्याने गाडी केली पार्क

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

वांद्रे-कुर्ला संकुलातील दोन मैदाने कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात. यापैकी एका मैदानासाठी एकनाथ शिंदेंच्या बाजूने, तर दुसऱ्या मैदानासाठी उद्धव ठाकरेंच्या बाजूने अर्ज आला होता. शिंदे गटाने ज्या मैदानासाठी अर्ज केला होता ते आरक्षित नव्हते, त्यामुळे त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला, तर शिवसेनेने अर्ज केलेले मैदान एका खासगी कंपनीने आरक्षित केले आहे, त्यामुळे शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आला, अशी माहिती ‘एमएमआरडीए’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे.

Exit mobile version