मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला इशारा
माझ्या त्यांच्यातल्या गोष्टी आहेत त्या आज सांगणार नाहीत. पण नंतर मलाही तोंड उघडावे लागेल. मलाही भूकंप करावा लागेल. आजही कधी कुणाच्यावर खालच्या पातळीवर बोललेलो नाही. धर्मवीरांच्या बाबत जे जे काही झालेले आहे, ते मला ठाऊक आहे. सिनेमाचे फक्त उदाहरण झाले पण प्रत्यक्ष जीवनात जे झाले त्याचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळी नक्की बोलेन, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकप्रकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मालेगावात केलेल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला. ते म्हणाले की, बाळासाहेबांसाठी आम्ही जीवाची बाजी लावली. १६-१७ वयापासून मेहनत करतो आहोत. कधी आम्ही मुलाबाळांना भेटलो? वर्षातून दोन तीन वेळा परदेशात गेलो नाही. शिवसेना एके शिवसेना केले. कधी वेळ-काळ दिवसरात्र बघितले नाही. बाळासाहेबांनी जे कार्यकर्ते निर्माण केले त्यातून शिवसेना मोठी झाली.
हे ही वाचा:
पाहा, उपमुख्य अभियंता काय करतोय? अमित साटम यांचे पत्र
पानाच्या दुकानात काम करणाऱ्या सांगलीच्या संकेत सरगरने मिळविले रौप्य
ज्या दिवशी माझी मुलाखत घेतली जाईल तेव्हा भूकंप होईल!
मुख्यमंत्र्यांच्या सत्यनारायण पूजेचा वाद न्यायालयात
त्या लोकांसोबत सत्ता स्थापन करण्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता मिळविली. मग त्यांच्यासोबत मुख्यमंत्रीपद मिळविलं. मग गद्दारी कुणी केली. मुख्यमंत्रीपदासाठी या पक्षांना जवळ केलं. स्वतः मुख्यमंत्री बनण्यासाठी? आम्ही हिंदुत्वाशी कधी तडजोड केली नाही, पण हिंदुत्वाशी प्रतारणा कुणी केली, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी प्रथमच उद्धव ठाकरे यांच्यावर हा घणाघात केला. याआधी शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. पण एकनाथ शिंदे यांनी एवढी कठोर टीका केली नव्हती. त्यामुळे आता एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातला सामना उत्तरोत्तर रंगत जाणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.