ठाकरे गटाचे सर्व बालेकिल्ले, गड जनतेने उध्वस्त करून टाकलेत

दापोलीच्या सभेतून एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा

ठाकरे गटाचे सर्व बालेकिल्ले, गड जनतेने उध्वस्त करून टाकलेत

महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दापोलीत प्रचारसभा झाली. या सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. तुमचे सर्व बालेकिल्ले आणि गड जनतेने उध्वस्त करून टाकले आहेत, असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “कोकणाने ठाकरे गटाला धुडकावलं आहे. कोकण बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या मागे उभे राहिले. उद्धव ठाकरे म्हणतात, कोकण आमचा बाल्लेकिल्ला, ठाणे आमचा बालेकिल्ला, छ. संभाजीनगर आमचा बालेकिल्ला पब, तुमचे सगळे बालेकिल्ले आणि गड जनतेने उध्वस्त करून टाकले आहेत. शिवसेना आणि धनुष्यबाणालाचं लोकांनी मतदान केलं आहे आणि करत राहतील,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

“तुमच्या बॅग तपासल्यावर लगेच म्हणतात, कुठला आहेस? बॅग उघडा, तुला नंतर उघडतो. तुला बघतो. अपॉईमेंट लेटर कुठेय? अपॉईमेंट लेटर खिशात घेऊन फिरतात का? अरे मुख्यमंत्री राहिलेला माणूस काय बोलतोय? याचा तरी विचार केला पाहिजे. आम्हाला माहिती आहे तुमच्या बॅगांमध्ये काही नसतं. कारण तुम्हाला बॅग पुरत नाहीत, खोके पुरत नाहीत; कंटेनर लागतो. हे मी नाही, राज ठाकरे म्हणाले आहे, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. कंटेनर कुठल्या राज्यात गेले हे बोलायला लावू नका. तुम्ही आयत्या बिळावर नागोबा बसलात. ते सरकारसुद्धा तुम्ही व्यवस्थित चालवू शकला नाहीत. आम्ही ५० आमदार घेऊन सत्तेच्या विरोधात गेलो. बाळासाहेबांशी बेईमानी करणाऱ्यांना कोकणात थारा मिळणार नाही. लोकसभेत ते दाखवून दिलं असून ठाकरेंची मशाल ही क्रांतीची नाही तर घराघरात आग लावणारी मशाल आहे, असाही टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.

हे ही वाचा : 

मोदी सरकारकडून राज्यात रेल्वेची १ लाख ६४ हजार कोटींची गुंतवणूक

पंतप्रधान मोदी नायजेरिया, ब्राझील, गयानाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना

नक्षलप्रभावित भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट; जीवितहानी नाही

वाशी चेकनाका परिसरातून ८० कोटींची चांदी जप्त

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना या निवडणुकीत जोडा दाखवा असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मविआ नेते न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. योजना बंद करावी म्हणून विरोधक हात धुवून पाठी लागले होते, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

दापोलीची जमीन ही पवित्र आणि संपन्न असून याच भूमीत बाळासाहेबांचा भगवा झेंडा हातात घेऊन योगेश कदम उभे आहेत. योगेश कदम यांचा विजय पक्का आहे. २३ तारखेला गुलाल उधळायचा आणि दिवाळी साजरी करायची आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Exit mobile version