गटनेतेपदावरून हटवल्यावर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून ‘शिवसेने’ला हटवले

गटनेतेपदावरून हटवल्यावर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून ‘शिवसेने’ला हटवले

विधान परिषद निवडणूकीनंतर राज्याच्या राजकारणात सध्या चांगलच नाट्य रंगलेलं पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे गुजरातमध्ये असल्याची माहिती असून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. त्यातचं आता एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचा बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना आता एकनाथ शिंदेंवर दबाव टाकत आहे.

शिवसेनेमध्ये सध्या उभी फूट पडल्याचे चित्र असून शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले आहे. तर एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून शिवसेनेचे नावही हटवले आहे.

हे ही वाचा:

एकनाथ शिंदे नाराज असल्याचे राऊतांनी केले कबुल

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे २८ आमदार फुटले

१३ आमदारांसह एकनाथ शिंदे नॉट रिचेबल; ठाकरे सरकार अडचणीत

“पराभवानंतर सरकार म्हणून विचार करण्याची गरज”

एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल होते. त्यानंतर ते सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्यांच्यासोबत १३ आमदार आहेत. मात्र, हे १३ आमदार कोण हे अजून अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे असलेल्या हॉटेलबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकार कोसळणार का? अशाही चर्चांना उधाण आले आहे.

Exit mobile version