विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदी भाजपाचा उमेदवार बसणार असल्याचे जवळपास निश्चित असून यावरून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अशातच, एकनाथ शिंदे हे अचानक त्यांच्या गावी गेल्यामुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली होती. मात्र, आता यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून, भाजपच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार शिंदेंनी केला.
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला आपला पूर्ण आणि बिनशर्त पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला. निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमानंतर विश्रांती घेण्यासाठी सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिवाय आता तब्येत बरी असल्याचेही एकनाथ शिंदे यानी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने प्रचंड यश दिले. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतू-परंतु नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा,” असे स्पष्ट मत एकनाथ शिंदे यांनी मांडले आहे.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला लोकांनी निवडून दिले आहे. लोकांना जी आश्वासने आम्ही दिली आहेत, ती आम्हाला पूर्ण करायची आहेत. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकांशी आम्ही बांधील आहोत आणि ती बांधीलकी जपायची आहे. मला काय मिळाले आणि कोणाला काय मिळाले, यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे, हे महत्वाचे आहे. जनतेने आम्हाला भरभरुन दिले आहे, आमच्यावर मतांचा वर्षाव केला आहे त्यामुळे आता आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे ही वाचा..
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘इंडी’ला दणका देत ‘आप’चा एकला चलोचा नारा
सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!
कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी
आता बदायूँमधील जामा मशिद म्हणजे नीळकंठ महादेव मंदिर!
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, मुख्यमंत्री भाजपचा असेल आणि इतर दोन युती भागीदारांकडे उपमुख्यमंत्री पदे असतील. दिल्लीतील बैठकीत महायुती भाजपच्या मुख्यमंत्रिपदासह सरकार स्थापन करेल तर उर्वरित दोन पक्षांना उपमुख्यमंत्री पदे असतील, असा निर्णय झाला आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केले होते.