कर नाही, त्याला नाही डर… उसका नाम राहुल नार्वेकर; विधानसभेत शिंदेंची शेरोशायरी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकरांचे अभिनंदन करताना भाषणात केली तुफान फटकेबाजी

कर नाही, त्याला नाही डर… उसका नाम राहुल नार्वेकर; विधानसभेत शिंदेंची शेरोशायरी

विधानसभेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली असून यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली असून यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची पुन्हा बिनविरोध निवड झाल्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मी पुन्हा येईन आणि ते पुन्हा आले त्यामुळे त्यांचेही पुन्हा अभिनंदन. त्यांनी आपला शब्द पूर्ण केला. अध्यक्ष म्हणाले नव्हते की, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले,” अशी मिश्कील टिपण्णी एकनाथ शिंदे यांनी केली.

पुढे एकनाथ शिंदे असेही म्हणाले की, “मी म्हणालो होतो २०० पेक्षा जास्त आमदार निवडून आले नाही तर शेती करायला जाईन. पण, २०० हून अधिक आमदार निवडणून आले. अजित पवार सोबत असल्यामुळे बोनस मिळाला आणि आले त्यानुसार २३७ आमदार आहेत. त्यामुळे आता विकास आणि प्रगतीचे पर्व सुरु झालं आहे,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एकनाथ शिंदे यांनी सभागृहामधील भाषणात एक शायरी देखील बोलून दाखवली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांचे कौतुक केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, “कर नाही, त्याला नाही डर… उसका नाम राहुल नार्वेकर” असं म्हणताच सभागृहात सर्वांना हसू आले. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह सर्वांनी शायरीनंतर दाद देत कौतुक केले. या शायरीनंतर रामदार आठवले आणि माझी आता युती झाली असं मिश्कील विधान एकनाथ शिंदेंनी केलं.

हे ही वाचा : 

न्यायप्रिय, संयमी व्यक्तिमत्व विधानसभेच्या अध्यक्षपदी लाभल्याचा आनंद

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवाड्यावर बंडखोरांचा ताबा

चिन्मय कृष्णा दास यांच्यासह शेकडो समर्थकांवर गुन्हा दाखल

“राहुल नार्वेकर हे साताऱ्याचे जावई आहेत आणि सातारा माझे गाव आहे. २०२२ मध्ये राहुल नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. अनेक ज्येष्ठ वकिल यायचे आणि सर्व कायद्याचा किस पाडायचे, अशा परिस्थितीत अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे त्यांनी निर्णय दिला. संयम ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं. आपण दिलेला निर्णय योग्यच होता. कारण जनतेनेही तोच न्याय दिला,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले. पण, आम्ही आमचे काम करत राहिलो. पहिले आम्ही दोघे होतो. नंतर अजितदादा आले. त्यानंतर आमचं तीन शिफ्टमध्ये काम सुरु होतं. लोकसभेला फेक नेरिटीव्ह केलं त्याचा फटका आम्हाला बसला. आता विरोधकांचा पराभव झाल्यावर ईव्हीएम मशीनवर खापर फोडतायत. निर्जीव ईव्हीएमवरती आरोप केला जातोय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील म्हणाले की, हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर बोलता. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले. नाना पटोले वाचले,” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावले.

Exit mobile version