उद्धव ठाकरे यांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे ट्विट, त्यांची भाषणे गाजत आहेत. दसरा मेळाव्याच्या आधी एकनाथ शिंदे यांनी केलेले नवे ट्विट आता चर्चेत आहे.
एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांची एक कविता ट्विट करत उद्धव ठाकरे यांना घायाळ करण्याचा प्रयत्न केला आहे.
मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नही होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे, ही हरिवंशराय बच्चन यांची कविता एकनाथ शिंदे यांनी ट्विट केली आहे. यावरून ठाकरे कुटुंबाला शिंदे यांनी एकप्रकारे लक्ष्य केले आहे.
सातत्याने ठाकरे कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे आली पण नंतर आदित्य ठाकरे यांना युवासेनेचे अध्यक्ष करण्यात आले आणि त्यांना कॅबिनेट मंत्रिपदही मिळाले. स्वतः उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीही झाले. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही आता राजकारणात कार्यरत झाल्या आहेत. त्यांच्याकडे शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादकपदही देण्यात आले. शिवाय, आता सणउत्सवांत त्या विविध मंडळांना भेटी देताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांचा गड असलेल्या टेंभीनाका देवीच्या दर्शनालाही त्या गेल्या होत्या. तिथे त्यांनी आरतीही केली होती.
हे ही वाचा:
अरूणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराचे चिता हेलिकॉप्टर कोसळून एका पायलटचा मृत्यू
नवरात्र २०२२: सतीचे दात इथे पडले म्हणून दंतेश्वरी शक्तीपीठ
नरेंद्र मोदींबद्दल आता पंकजा मुंडेंनी केले हे वक्तव्य
रावणाच्या आईने आयुष्य व्यतित केले श्रीराम नामात
तेजस ठाकरे यालाही लवकरच राजकारणात लाँच केले जाईल, असे म्हटले जात आहे. त्याच्या नावाचीही चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे हे ट्विट ठाकरेंच्या घराणेशाहीला उद्देशून असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याविषयी चर्चा असताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद घेतले. मात्र त्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला साथ देत सत्ता मिळविली. त्यामुळे शिंदे आणि शिवसेनेचे अनेक आमदार नाराज झाले. ती नाराजी त्यांनी बंडाच्या रूपात जाहीर केली.