विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच फैलावर घेत खडेबोल सुनावले. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी इतरही चर्चेतील विषयांवर भाष्य केले.
संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा विरोधकांकडून नेहमी मारल्या जातात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना बोट दाखवतात तेव्हा तीन बोटं तुमच्याकडे असतात. मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना, प्रदीप मोरेला मारताना, केतकी चितळेला तुरुंगात डांबताना संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे पोटदुखी झाली तेव्हा संविधान कुठे होतं? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडताना, खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचताना, उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना, सचिन वाझे हा लादेन नाही म्हणताना संविधान आठवलं नाही का? नारायण राणेंना अटक करताना, कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होतं संविधान? अशा तिखट प्रश्नांची सरबत्तीचं एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटासमोर आणि मविआसमोर लावली. संविधानचा गळा घोटला असं म्हणणाऱ्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. असे बरेच उद्योग आहेत ते बाहेर काढले तर हे कोरं संविधान घेऊन पळावं लागेल तुम्हाला, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, मशाल पेटवून खुशाल झोपणाऱ्यांना या निकालामुळे शहाणपण आले असेल. कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल, अशी यांची वृत्ती आहे, असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. लोकांनी यांना दाखवून दिले आहे की, खरे कोण; त्यानंतरही हे सुधारत नाहीत. तुम्ही गद्दार गद्दार म्हणत बसला तर तुम्हाला एक दिवस दार बंद करुन पक्षाचे दुकान बंद करावे लागले, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
हे ही वाचा..
कुणाल कामरा, सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव
“युद्ध थांबवा!” म्हणत उत्तर गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांची हमास विरोधात निदर्शने
तुंगनाथ मंदिर मार्गावर जखमी युवकाचा यशस्वी बचाव केला
युवा लेखकांना मिळणार संधी; PM YUVA 3.0 कार्यक्रमाची घोषणा
काही लोक मिस्टर बीन असून ते सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजतात. त्यामुळेच सगळेजण सोडून गेले. कचऱ्यातून जी एनर्जी निर्माण झाली त्याचा हायव्होल्टेज शॉक बसला. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबीनमध्ये टाकली होती. ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.