शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंची सभा सुरू असताना आझाद मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दणक्यात सभा झाली. त्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे कुणाशीही हात मिळवू शकतात. आपल्या स्वार्थासाठी ते हमास आणि लष्कर ए तैय्यबाशीही युती करायला मागेपुढे पाहणार नाहीत. इंडी आघाडीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाशी साधलेल्या संधानाबद्दल शिंदे यांनी ठाकरेंवर ही घणाघाती टीका केली. ते म्हणाले की, काही जण छाती बडवतात की मर्द आहोत, मर्द आहोत. मग मर्द आहोत हे सांगावं का लागतं? ही सभा बाळासाहेबांच्या शिवसैनिक मर्दांची आहे. तिकडे आहे ती हुजरे आणि कारकुनांची आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. ते म्हणाले की, एका बैठकीत धर्मवीर आनंद दिघे यांनी राज ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले काढले पण ते उद्धव ठाकरेंना बहुतेक पसंत पडलेले नाहीत. कारण त्यानंतर लगेच आनंद दिघेंचे पंख छाटण्याचं काम सुरू झालं. दिघेंना कशाप्रकारे वागविण्यात आले त्याचा मी साक्षीदार आहे. आनंद दिघेंना अपघात झाला तेव्हाही ते बघायला आले नाहीत. अंत्ययात्रेलाही आले नाहीत. आम्हीच दिघेंची सगळ्यात मोठी समाधी बांधली. या समाधीला भेटदेखील दिली नाही. मी जेव्हा त्यांना (उद्धव ठाकरे) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, आनंद दिघेंची संपत्ती कुठे कुठे आहे? अरे तो फकीर माणूस होता. त्यांच्याकडे काय संपत्ती असणार, उद्धव ठाकरेंचं तर काही कर्तृत्व नव्हतंच. पण ठाकरे प्रचंड मेहनत करायचे, असेही जुने किस्से एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर खोकासूर असा आरोप केला होता त्याला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांशी ते रक्ताचं नातं सांगतात पण त्यांच्या विचारांचा गळा यांनीच घोटला. यांची बांधिलकी फक्त पैशांशी. त्यांनी निर्लज्जपणाचा कळस गाठला. कोणतीही सीमा ठेवली नाही. आम्हाला जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतपणे दिले तेव्हा शिवेसनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये बँकेकडे मागितले होते. बँकेने नकार दिला. बँकेने त्यांना स्पष्ट केले होते की, निवडणूक आयोगाने शिवसेना एकनाथ शिंदेना दिली आहे. त्यांनी निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवले. या एकनाथ शिंदेंनी क्षणाचाही विलंब न लावता ५० कोटी द्यायला लावले. मी खोके आणि ओके बोलणार नाही. कारण खोके त्यांना पुरत नाहीत. त्यांना जवळून ओळखणारे म्हणाले की यांना खोके चालत नाही, यांना कंटेनर पाहिजे. त्याचा साक्षीदार माझ्यापेक्षा दुसरा कोण असू शकतो, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मोदींनी पूर्ण केले बाळासाहेबांचे स्वप्न
शिंदे यांनी सांगितले की, बाळासाहेब म्हणाले होते की मला पंतप्रधान करा, मी राममंदिर बांधतो आणि कश्मीरमधील ३७० कलम हटवतो. आता मोदींनी राम मंदिर बांधलं आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवलं. मोदींनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली.
हे ही वाचा:
इस्रायलची अटीतटीची लढाई; आता ‘आकाश-पाताळ’ एक करणार
दसऱ्यानिमित्त भारत- चीन सीमेवर शस्त्रपूजन
महाराष्ट्राला तिरंदाजाची भूमी बनवू
निलेश राणेंचा राजकारणाला ‘जय महाराष्ट्र’
शिंदे यांनी २०१९मधील घटनाही सांगितली. शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे तेव्हा म्हणाले, बाळासाहेबांना मी शब्द दिला आहे शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, आम्ही विचारात पडलो कुठल्या शिवसैनिकाला बसवणार? मात्र हे महाशय टुणकन उडाले आणि खुर्चीत बसले. म्हणाले मला कुठे व्हायचंय, पवार साहेबांनी सांगितलं. पण खरे म्हणजे यांनीच पवारांकडे दोन माणसे पाठवली होतीत आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करा अशी विनंती केली. हे काही लपत नाही.
शिंदेंनी सांगितले की, यांचं मुख्यमंत्रीपदावर २००४पासूनच बसायचं ठरत होतं, पण जुगाड काही होत नव्हता, मुख्यमंत्री व्हायचंच होतं मात्र दाखवायचं नव्हतं, एक चेहरा आहे पण त्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे दडले आहेत. भोळेपणाने तिकडे आहेत त्यांनी सावध व्हावं, चेहऱ्यावर जावू नका, पोटातील पाणीही हालून दिलं नाही.