काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता रविवार, १७ मार्च रोजी मुंबईत झाली. यावेळी इंडी आघाडीतील नेत्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार, १८ मार्च रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. “रविवारची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग होती. भानुमती का कुणबा, कहीं से इंटे, कहीं से रोडे अशी म्हण आहे. सगळे नैराश्य चेहऱ्यावर असलेले लोक तिथे होते. उत्तर प्रदेश, बिहारमधून तडीपार, हद्दपार झालेले लोक तिथे आले होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की पकडून आणलेले लोक तिथे होते. हे दुर्दैवी आहे,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
उद्धव ठाकरेंचा ‘माझ्या तमाम हिंदू बांधव-भगिनींनो’ हा शब्द बंद
“रविवारच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंचा एक शब्द बंद झाला. ‘माझ्या तमाम हिंदू बांधव-भगिनींनो’. यावरून लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांची भूमिका, धोरण हे सगळं त्यांनी सोडलं आहे. म्हणून तर आम्हाला त्यांना सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ‘अब की बार, तडीपार’ असं काल दिसत होतं. इतर राज्यांतून तडीपार झालेले लोक मोदींना तडीपार कसं करू शकतात?” असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.
“स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आणि बाळासाहेबांच्या स्मारकासमोर ही सभा झाली. उबाठाच्या लोकांनी आधी त्या समाधीवर जाऊन माफी मागायला हवी होती. सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्यांबरोबर, सनातन धर्माचा अवमान करणाऱ्यांबरोबर बसावं लागतं आहे. फारूख अब्दुल्लांबरोबर बसावं लागतं आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे,” अशी घाणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
“मुंबईच्या शिवाजी पार्कवर झालेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटं देण्यात आली होती. यावरुन त्यांची पत कळून आली. उद्धव ठाकरे यांच्याकडे आता खासदार आणि आमदार उरलेले नाहीत. त्यामुळे ठाकरेंकडे उरलेल्या पक्षाच्या ताकदीप्रमाणे त्यांना भाषणासाठी फक्त पाच मिनिटं दिली. यावरुन त्यांची पत कळाली,” अशी तिखट टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही
“राहुल गांधींनी ‘हिंदू धर्माची शक्ती’ असा उल्लख केला आहे. हिंदू धर्माची शक्ती संपवायची ताकद आहे का त्यांच्याकडे? याचं उत्तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत देईल. हिंदू धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही. एवढा मोठा राष्ट्रीय नेता, पण ठाण्यातल्या सभेला ५०० लोकही नव्हते. फ्लॉप शो झाला. मुंब्र्यात तर ४-५ लोकही नव्हते. सगळ्या गाड्या होत्या. एक नेता तर कुणालातरी मारतही होती गर्दी झाली नव्हती म्हणून,” अशी जहरी टीका एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली.
हे ही वाचा:
अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावल्यामुळे दुकानदाराला मारहाण!
एसबीआयला निवडणूक रोख्यांचे सर्व तपशील उघड करण्याचे निर्देश
एल्विश यादवने पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरविल्याची दिली कबुली!
कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!
राज्यात झालेल्या विकासकामांविषयी मुख्यमंत्री म्हणून समाधानी
गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये राज्यात झालेल्या विकासकामांविषयी मुख्यमंत्री म्हणून समाधानी असून या काळात महाराष्ट्रात अनेक योजना आल्या आहेत. राज्याने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. पायाभूत सुविधांमध्ये राज्य एक नंबरला आहे. तसेच परकीय गुंतवणुकीतही राज्य आघाडीवर आहे. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये सरकारविषयी सकारात्मक वातावरण आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.