मुंबई महानगरपालिकेवर ठाकरे गट काढत असलेला मोर्चा हा स्वतःची काळी करतूत झाकण्यासाठी काढला जात आहे. पण, याला मुंबईकर उत्तर देतील, अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठाला भेट देऊन शिवसैनिकांसोबत जल्लोष साजरा केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत ठाकरे गटावर आणि अजित पवारांवर निशाणा साधला.
“मोर्चा कोणी कोणावर काढायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्यांची गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता होती; ज्यांनी गेली २५ वर्षे महापालिकेत लुट केली आणि आपली घरं भरली; मुंबईकरांना सुविधांपासून वंचित ठेवलं; कोविड मध्ये माणसं मरत होती आणि इकडे कोविडच्या नावाखाली यांची माणसं पैसे लुटत होते, ते मोर्चा काढत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.
“मृतदेह ठेवायच्या पिशवीची किंमत ६०० रुपये असताना ५ हजार घेतले जात होते. ठाण्यात त्याच पिशवीची किंमत ३२५ रुपये होती. ऑक्सिजन प्लांट, औषधे यातही त्यांनी पैसे लाटले. किती भ्रष्टाचार करावा? मृतदेहांच्या पिशवीचे पैसे खाणं याहून मोठं पाप काय असेल? भ्रष्टाचाराचा उच्चांक यांनी गाठला आणि मढ्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचं काम देखील यांनी केलं,” अशी घाणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर केली.
“इतकी वर्षे मुंबईकरांना खड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करावा लागला. लोकांना गाणी बनवावी लागली. पण, ही काम आधीच केली असती तर अशी वेळ आली नसती. कोविड काळात पैसे लाटण्यासाठी लाईफलाईन सारखी कंपनी उभी केली त्याची चौकशी आता ईडीकडून सुरू आहे त्यामुळे लवकरच जनतेसमोर सत्य बाहेर येईल. कोविड काळात, खड्ड्यांमुळे लोकांचा मृत्यू झाला आणि त्याच्या मागे कोण आहे? हे ही जनतेसमोर येईल,” असे आरोप करत एकनाथ शिंदे यांनी टाकरे गटावर टीकास्त्र डागले.
“उलटा चोर कोतवाल को डाटे. दरोडा घालायचा आणि चोरी केली म्हणून ओरडायचं अशा वृत्तीला मुंबईकर योग्य ते उत्तर देतील. कितीही आदळआपट केलीत तरी मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकता येणार नाही. ईडीच्या चौकशीतून सर्व बाहेर येईल. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचं पाप त्यांनी केलं आहे आणि ते आता बाहेर येईल म्हणून घाबरलेले आहेत. पालिकेवर काढण्यात येत असलेला मोर्चा हा स्वतःची काळी करतूत झाकायला काढला जातो आहे. पण, मुंबईकर त्याला योग्य उत्तर देतील,” असा घाणाघात एकनाथ शिंदेंनी केला आहे.
अजित पवार मनापासून बोलत नाहीत; विरोधी नेत्याच्या भूमिकेमुळे बोलावं लागतं
सरकारच्या कामावर टीका करणं हे विरोधी नेत्याचे काम. त्यामुळे ते त्यांचं काम करत आहेत आणि आम्ही सरकार म्हणून आमचं काम करत आहोत. अजित पवार हे सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहेत त्यामुळे कौतुक करत नाहीत. सध्या अजित पवार मनातून बोलत नाही. विरोधी पक्ष म्हणून त्यांना बोलावं लागत आहे,” असा टोला एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना लागवला.
“शरद पवारांनी अजित पवारांसोबत काय केलं आहे हे त्यांना माहित आहे. शरद पवारांनी फडणवीसांची नाही तर अजित पवारांची विकेट घेतली,” अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी केली.
वारीचे सरकारकडून उत्तम नियोजन
पंढरपूरच्या वारीसाठी सरकारने उत्तम नियोजन केलं होतं. पालकमंत्री राधाकृष विखे- पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंत यांनी जातीने लक्ष घालून सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. शिवाय आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. त्यावेळी वारकरी संप्रदायाचे लाखो लोक भेटले त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले. त्यांनी स्वतः सांगितले की, यंदाच्या वर्षीची सुविधा अतिशय उत्तम आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंत सर्व सोयी उत्तम करण्यात आल्या होत्या, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पण, त्यावरूनही विरोधकांना टीका करायची असेल तर निंदकाचे घर असावे शेजारी, अशी म्हण एकनाथ शिंदेंनी वापरत टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला.
हे ही वाचा:
३६५ दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या सरकारचा ट्विस्ट आणि टर्न्सचा प्रवास कसा होता?
अतिक अहमदने बळकावलेल्या जमिनीवर बांधलेली घरे योगींनी केली सुपूर्द
कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांना दुसऱ्यांदा समन्स
८० व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या अभिनेत्री आशा नाडकर्णी यांची कारकीर्द कशी होती?
एकनाथ शिंदेंचा फडणवीसांना व्हिडीओ कॉल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंद मठाला भेट देऊन शिवसैनिकांसोबत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. शिवसैनिकांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार वर्षपूर्तीच्या शुभेच्छा दिल्या.