राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यातून काहीस राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. तर, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाची पिछेहाट झाली आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी महायुतीला कौल दिला यासाठी मतदारांचे आभार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आहेत. “महाविकास आघाडीने जी काम थांबवलेली, प्रकल्प रोखलेले त्याला चालना देण्याच काम केले. राज्याच्या सर्वांगीण विकासाचे धोरण आखले. राज्यातील सर्वसामान्य माणूस, शेतकऱ्यापासून उद्योजकापर्यंत तरुण, ज्येष्ठ नागरिक, भगिनी या सगळ्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले,” अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत निकालानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
“महाविकास आघाडीपेक्षाही अधिक सरपंच आणि सदस्य महायुतीचे निवडून आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांनी जनतेला न्याय देण्याचं काम केलं,” अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
“काहींनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोपात वर्ष घालवले. ज्यांनी मतदारांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली, त्यांना लोकांनी नाकारलं आहे. मतदारांशी प्रतारणा केलेल्यांना जनतेनं घरी बसवलं. असेही घरी बसण्याची सवय त्यांना होतीच,” असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
हे ही वाचा:
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!
“शासन आपल्या दारी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचले आहे. कृतीतून मतदारांनी हे दाखवून दिलं आहे. महाविकास आघीडापेक्षा कितीतरी पटीने अधिक सरपंच, सदस्य महायुतीचे निवडून आले. म्हणून राज्यातील जनतेचे आभार मानतो,” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.