“मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे उद्धव ठाकरेच आहेत,” अशी घाणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर पत्रकार परिषद घेऊन निशाणा साधला. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला होता. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मराठा समाजाबद्दल उद्धव ठाकरेंना किती संवेदना आहेत हे उद्धव ठाकरेंनाही माहित आहे आणि मराठा समाजाला देखील माहित आहे, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्याकाळात मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. उच्च न्यायालयात ते चॅलेंज झालं. पण ते टिकवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केलं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. “सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण गेल्यानंतर त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होतं? उपसमितीचे अध्यक्ष कोण होतं? त्यांनी हे आरक्षण टिकवलं नाही. खरंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. त्यामुळे तुम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता-भगिणींचा अपमान करणारे कोण होतं हे देखील सखल मराठा समाजाला माहिती आहे”, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.
“मराठा समाजाचं आरक्षण घालवायला तुम्ही जबाबदार आहात. आम्ही ते आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठी क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. या सर्वाला कारणीभूत असणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार उरलेला नाही,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली आहे.
हे ही वाचा:
‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’
डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात
मुकेश अंबानींना तिसऱ्यांदा धमकीचा ईमेल
टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं आहे. सध्या राज्यात मराठा आंदोलक चांगेलच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत आहेत.