काही लोकांना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याबरोबरच काही लोकांना हिंदुत्वाबद्दल द्वेष आहे. अशा सगळ्यांची दुकाने लवकरच बंद होणार आहेत. जर हिंदुत्व घराघरात पोहोचलं तर यांची दुकाने कायमस्वरूपी बंद होतील, असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी हा इशारा दिला. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वारंवार सावरकरांचा अपमान करत आहेत आणि त्यांना इतर पक्षांची साथ आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आमदार व खासदारही अयोध्येला आले होते. तिथे रामलल्लाचे दर्शन, प्रभू श्रीरामाच्या मंदिरनिर्माणाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
राहुल गांधींवर शरसंधान करताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांची दुकाने आता बंद होणार आहेत. ४०० वरून ४० वर आले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले. मोदींवर ज्यांनी आरोप केले त्यांची काय अवस्था झाली हे सगळ्यांना ठाऊक आहे.
मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारताच्या केलेल्या बदनामीबाबतही टीका केली. काही लोक बाहेरच्या देशात जाऊन मुद्दाम भारताची बदनामी करतात. हा एकप्रकारचा देशद्रोह आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरही शरसंधान केले. पत्रकारांनी राज ठाकरेंशी आपले चांगले संबंध आहेत यावरून छेडले असता मुख्यमंत्री म्हणाले की जेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो तेव्हा राज ठाकरेंना भेटता येत नव्हते. उद्धव ठाकरेंना त्यांची एलर्जी होती. पण आता कसलेही बंधन नाही. आता आम्ही भेटू शकतो. त्यामुळे आमच्या भेटीगाठी होतात.
एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आमचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. ते एक चांगले व्यक्ती आहेत. आम्ही चांगले काम करत आहोत. परंतु त्यात कोणतीही राजकीय चर्चा वगैरे करत नाही. शिंदे यांनी सांगितले की, अनेकांना या अयोध्या दौऱ्यामुळे पोटदुखी झालेली आहे. या दौऱ्याची ऍलर्जीही झालेली आहे पण हा दौरा आमच्यासाठी आस्थेचा, अस्मितेचा विषय आहे. त्यांची दुकाने मात्र आमच्या दौऱ्यामुळे बंद होतील, त्यामुळे ते हिंदुत्वाला, हिंदू धर्माला विरोध करत आहेत. २०१४ला हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही सरकार बनवलं होतं, २०१९लाही तसंच सरकार येणार होतं पण स्वार्थासाठी आणि खुर्चीच्या लालसेपोटी चुकीचं पाऊल उचललं गेलं. मात्र आठ महिन्यांपूर्वी आम्ही ती चूक सुधारली आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंना त्यांनी लक्ष्य केले.
हे ही वाचा:
मंदिर वही बनायेंगेचा नारा सत्यात उतरतांना बघतोय
शरद पवारांनी केली विचारवंत, पुरोगाम्यांची कोंडी
भारतातील वाघांची संख्या वाढली, आता ३१६७ वाघ
राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागून प्रकरण संपवायला हवं होतं!
मी घरी बसणारा मुख्यमंत्री नाही!
मी आदेश देऊन घरी बसणारा मुख्यमंत्री नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. गेल्या आठ नऊ महिन्यात महत्त्वाचे निर्णय घेतले. शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे लोक म्हणत आहेत. अयोध्येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होते आहे असे म्हणत आहेत पण मी जिल्हाधिकारी आणि इतरांशी संपर्कात आहे. आदेश देऊन घरी बसणारा मुख्यमंत्री नाही.
अयोध्येतून आम्ही प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जाणार आहोत. प्रभू श्रीरामाने वडिलांना वचन दिले होते ते पाळले. कुणीतरी सांगितले की वनवास भोगायचा आहे ते वचन त्यांनी निभावले. १४ वर्षांसाठी ते वनवासात गेले. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती की, अयोध्येत मंदिर व्हायला हवे. त्या मंदिराविरोधात जे पक्ष होते, त्यांच्यासोबत सत्तेसाठी काही लोक गेले, असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.