“बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच कोकणातील लोकांनी ठाकरे गटाची साथ सोडली. कोकणातून त्यांचा एकही खासदार लोकसभेत निवडून आला नाही. आता आमदारही कोकणात दिसणार नाही,” असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, स्टे दिलेले, स्पीड ब्रेकर घातलेले प्रकल्प आम्ही सुरु केले. विकासाचे प्रकल्प, कल्याणकारी योजना, लाडकी बहीण सारख्या अनेक योजना आम्ही आणल्या. विकास आणि योजना याची सांगड घालण्याचे काम आम्ही केलं. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उद्योग आले आहेत. जनता जनार्दन येणाऱ्या काळात आमच्या कामाची पोचपावती देईल. महायुतीचं सरकार, बहुमताचं सरकार महाराष्ट्रात येईल. आम्ही पुन्हा एकदा जनतेची सेवा करण्यास तयार आहोत,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
“ठाणे लोकसभा जिंकण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र, त्यांची पळता भुई थोडी झाली. बाळासाहेबांचे विचार सोडले. त्यामुळेच कोकणाने त्यांची साथ सोडली. कोकणात एकही खासदार आला नाही, आता एकही आमदार येऊ देणार नाही; सगळे किल्ले उद्ध्वस्थ झाले आहेत,” असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर टीका केली. लोकसभा निवडणुकीत मशाल विरुद्ध धनुष्यबाण जिंकलेला आहे. लोकसभेत आम्ही १३ जागा समोरासमोर लढल्या. त्यातल्या आम्ही सात जागा जिंकल्या. आमचा ४७ टक्के स्ट्राईक रेट होता, त्यांचा ४० टक्के स्ट्राईक रेट होता. त्यांच्यापेक्षा २ लाख मतं आम्ही जास्त घेतली आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हे ही वाचा :
जेएनयूमध्ये होणारी इराण, पॅलेस्टाईन, लेबेनॉनच्या भारतातील राजदूतांची व्याख्याने रद्द
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!
भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात
झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज
लोकसभा निवडणुकीत फेकाफेकी करुन, फेक नरेटिव्ह करुनही धनुष्यबाण भारी पडला होता. लोकांना फसवून देखील लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट उबाठापेक्षा चांगला होता. कामाच्या जोरावर महायुतीचा विधानसभेलाही स्ट्राईक रेट एकदम सगळ्यात भारी असेल. महायुती सर्वांना चारीमुंड्या चित करेल. या निवडणुकीत आमचे लोक चौकार, षटकार मारतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.