मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी घोषित केली आहे. या यादीत ८ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, हेमंत पाटील, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे, राजू पारवे यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच यादी आहे. त्यामुळे एकूण महायुतीचे ३३ उमेदवार जाहीर झाले आहेत. आणखी १५ उमेदवारांची नावे घोषित व्हायची आहेत.
मावळमधून श्रीरंग बारणए, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेतून धैर्यशील माने, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव, शिर्डीत सदाशिव लोखंडे, दक्षिण मुंबईतून राहुल शेवाळे यांना ही उमेदवारी दिलेली आहे. मुंबईतून केवळ शेवाळे यांचेच नाव समोर आले आहे. अद्याप कल्याण, ठाणे, वाशिम याठिकाणी उमेदवार जाहीर झालेले नाहीत. कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. त्यांचे नावही या यादीत जाहीर झालेले नाही.
ठाण्यातून शिवसेनेची उमेदवारी कुणाला मिळेल याविषयी अद्याप स्पष्टता आलेली नाही. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली जाईल असे बोलले गेले होते. पण नाशिकची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही.
हे ही वाचा:
सॅटेलाइटवरून कापला जाणार टोल; वेळेबरोबर इंधनाची होणार बचत
भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले
अबब! आयपीएलमध्ये दोन्ही डावात मिळून ५२३ धावांचा डोंगर
संजय राऊत अकोल्यातून ‘वंचित’च्या विरोधात देणार होते उमेदवार
रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे शिंदे यांच्या शिवसेनेत आले खरे पण शिवसैनिक ठाकरे यांच्यासोबत असल्यामुळे पेच निर्माण झाला होता. या मतदारसंघातून तुमाने दोनवेळा विजयी झालेले आहेत. प्रारंभी ते एकनाथ शिंदेसोबत जायचे की ठाकरेंसोबत याविषयी संभ्रमात होते. पण त्यांनी अखेर शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी शिंदेना साथ दिल्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या विभागात पारवे यांनाच उमेदवारी दिली आहे. तुमाने यांची संधी त्यामुळे हुकली आहे.
आता दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे अशी लढत होईल. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदेंच्या गटातील सदाशिव लोखंडे यांच्यात सामना होईल. बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदे गटाचे प्रतापराव जाधव, हिंगोलीत नागेश पाटील विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत पाटील तर मावळमध्ये संजोग वाघेरे विरुद्ध शिंदे गटातील श्रीरंग बारणे अशा लढती होतील.