लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता केंद्रात एनडीए सरकार स्थापन करणार आहे. याचं पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत तर इतर काही खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये एनडीएमधील अनेक मित्रपक्षांच्या खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांची यात वर्णी लागलेली आहे. दरम्यान, शिवसेनेला मिळालेलं मंत्रीपद हे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी प्रतापराव जाधवांना मिळालं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर श्रीकांत शिंदेंनी मंत्रीपद नाकारण्यामागचं कारण सांगत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, “एकनाथ शिंदेंनी नेहमीच कार्यकर्त्याला प्राधान्य दिलं आहे. आजही तेच उदाहरण महाराष्ट्रानं पाहिलं. मी तिसऱ्यांदा खासदार झालो असून सध्याच्या परिस्थितीतही मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो आहे. सगळ्यांची इच्छा होती की मी केंद्रात मंत्री व्हायला हवं. पण आत्ता पक्षाला सगळ्यात जास्त गरज पक्षबांधणीची आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. माझ्यापेक्षा जेष्ठ सदस्य पक्षात आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी संधी दिली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, महाराष्ट्रात योग्य तो संदेश गेला आहे,” असा सणसणीत टोला त्यांनी नाव न घेता विरोधकांना लगावला आहे.
श्रीकांत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला आहे. “याआधी अनेक उदाहरणं आपण पाहिली. काही पक्षांमध्ये त्यांनी स्वत:चा मुलगा पॅराशूट लँडिंग करून आमदार करून घेतला. दोन विद्यमान आमदारांना घरी बसवलं. पुन्हा त्यांना आमदार केलं. त्यानंतर मुलाला मंत्रीपद दिलं. जिथे कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं होतं, तिथे तीन तीन जणांना एकाच विधानसभेत तुम्हाला आमदारकी द्यावी लागली. शिंदेंनी पुत्रमोह बाजूला ठेवला. त्यांच्या पुत्रानंही पक्षासाठी तो निर्णय मान्य केला,” अशी टीका श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसची ‘खटाखट योजना’ म्हणजे मतदारांना लाच देणे; ९९ खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी
एअर कॅनडाच्या विमानाला टेकऑफनंतर आग; विमान सुरक्षितपणे उतरवण्यास यश!
काँग्रेसच्या प्रमुखांना पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण!
संगीतकार विशाल दादलानीला सोशल मीडियावर ठोकून काढले!
“फक्त दोन वर्षांत लोकांना वाटत नव्हतं की शिवसेनेचे दोन खासदारही निवडून येतील. पण सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेचा आहे. सात खासदार निवडून आले. चार खासदार आणखी निवडून आले असते. शेवटच्या क्षणी नाव जाहीर करणं, बदल करणं या गोष्टी केल्या नसत्या तर ते शक्य होते. त्याचं विवेचन होऊन आम्ही त्यावर मार्ग काढू,” असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला आहे.