उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये, मदतीला आला वेग

पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी झाले रवाना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये, मदतीला आला वेग

जम्मू आणि काश्मीरमधील पेहेलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना सुखरूप राज्यात परत आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले असतानाच आता तिथे अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरूप राज्यात आणण्याचे प्रयत्न देखील सुरू झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यादृष्टीने प्रयत्न केले असून राज्यातील सर्व पर्यटकांना मदतीचा हात देण्याचे ठरविले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे मदत पथक काल रात्रीच मुंबईहून श्रीनगरसाठी रवाना झाले आहे. या पथकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर, डोंबिवलीचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम आणि इतर सहकाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना विमानात बसवून रवाना केल्यानंतर आता जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या बाकीच्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

ठाणे आणि डोंबिवली येथून काश्मीर सहलीसाठी गेलेल्या ४० आणि ५५ जणांच्या ग्रुपशी या मदत पथकाने संपर्क केला असून त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच त्यांच्यासह तिथे अडकलेल्या राज्यातील इतर पर्यटकांच्या देखील ते संपर्कात असून त्यांना देखील सुखरूप राज्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मदत कार्यावर लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत राज्यातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

हिंदूंच्या अंगावर याल तर सगळे हिंदू तुमच्या अंगावर येवू, शक्ती कळायलाच हवी!

‘पहलगाम हल्ला : सचिन-कोहली दुखी’

पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार म्हणून सैफुल्लाह कसुरीचे नाव समोर! 

करारा जवाब मिलेगा !

मात्र सध्या श्रीनगर मधील परिस्थिती नाजूक असून पर्यटकांना परत आणण्यासाठी यंत्रणांशी संपर्क साधून समन्वय साधावा लागत आहे. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे शर्थीचे प्रयत्न शिवसेनेच्या मदत पथकाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच केंद्र शासनाच्या मदतीने या पर्यटकांना सुखरूपपणे राज्यात आणले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version