शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मुंबईत मातोश्रीला गेलेल्या शहापूर तालुक्यातील कसाऱ्यातील सेना पदाधिकारी भगवान काळे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना तीन लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील शिंदे यांनी स्वीकारले आहे.
कसारा येथील वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांसोबत भगवान काळे हे काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
भगवान काळे यांचा मातोश्रीबाहेर मृत्यू झाल्याची बातमी माध्यमांमध्ये चर्चेत होती. मात्र, तरीही या कुटुंबाचे साधे सांत्वन करण्यासाठी शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही की मातोश्रीवरून या कुटुंबाच्या सांत्वनासाठी फोन गेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
हे ही वाचा:
‘सोनिया सेना मग शरद सेना आता रडकी सेना’
एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक
कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या घटनेची माहिती मिळताच पदाधिकाऱ्याच्या कुटूंबियांना तीन लाख रुपयांची मदत करण्याचे निर्देश दिले असून काळे यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारले आहे. यातील एक लाख रुपयांची मदत माजी आमदार पांडुरंग बरोरा आणि साईनाथ तारे यांनी काळे कुटूंबियांना सुपूर्द केली आहे.