एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर ३० जूनला शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार पुन्हा एकदा आले. त्याला ७ ऑक्टोबरला १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
हा गेल्या १०० दिवसांचा कालावधी प्रचंड नाट्यपूर्ण ठरला आहे. विधान परिषद निवडणूक, राज्यसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड उलथापालथ झाली. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार सूरतला रवाना झाले होते नंतर ते गुवाहाटीला गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असाच अंदाज होता आणि मीडियात तशा बातम्याही अगदी ठामपणे दिल्या गेल्या. पण प्रत्यक्ष शपथविधीवेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला गेले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यावेळी फडणवीस हे सरकारबाहेर राहून मदत करतील असाही होरा होता. पण केंद्रातून फडणवीस यांना सरकारमध्ये सामील होण्याचे सुचविण्यात आले आणि फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले.
त्यानंतर हे सरकार अस्तित्वात आले. मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी काही काळ गेला. नव्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. त्यावेळी ५० खोके एकमद ओके अशा घोषणा देताना शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अधिक पुढे दिसले. त्यात धनंजय मुंडे आघाडीवर होते. त्याआधी, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने १ ऑगस्टला अटक केली आणि महाविकास आघाडीचा एक प्रमुख प्रवक्ता तुरुंगात गेला. तेव्हापासून संजय राऊत हे तुरुंगातच आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होऊ लागले. उद्धव ठाकरे यांना सोडून अनेक शिवसैनिक, पदाधिकारी, हे शिंदे गटाला जाऊन मिळाले. अगदी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील चंपासिंग थापा हेदेखील शिंदे गटासोबत आले. त्याची सर्वाधिक चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू जयदेव ठाकरे हेदेखील दसऱ्याच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसले. त्याचीही खूप चर्चा झाली.
हे ही वाचा:
आरआरआर ऑस्करच्या शर्यतीत, १४ विभागात नामांकन
लडाखमध्ये दरड कोसळून दोन जवान ठार
भारत करणार चौथ्या औद्योगिक क्रांतीचे नेतृत्व
ईडीचे दिल्ली-पंजाब आणि हैदराबादमधील ३५ ठिकाणी छापे
दसरा मेळाव्यावरूनही दोन्ही गटात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी पार्क मैदान कुणाला मिळणार यावरून वाद रंगला होता. दोन्ही गट शिवाजी पार्कवर दावा करत होते. अखेर बीकेसीच्या मैदानासाठी शिंदे गटाने अर्ज केला होता. तरीही न्यायालयात हे प्रकरण पोहोचले. शेवटी न्यायालयानेही शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरे यांना मिळणार हे जाहीर केले. त्यानंतर प्रत्यक्ष दसऱ्याच्या दिवशी दोन्ही गटाच्या शक्तिप्रदर्शनामुळे अभूतपूर्व असे राजकीय वातावरण तयार झाले. प्रथमच एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात मेळावे झाले.
या शंभर दिवसांत अनेक महत्त्वाचे निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतले. विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडवून धरलेल्या प्रकल्पांना वाट मोकळी करण्यात आली. मेट्रोचा प्रकल्पही स्थगितीतून बाहेर काढण्यात आला तर जे प्रकल्प खर्चिक होते त्यांना थांबविण्यात आले. औरंगाबाद, धाराशिवचे नामकरण करण्यात आले. या दरम्यान खरी शिवसेना कुणाची यावरूनही रोज चर्चा सुरू आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडेच पक्षचिन्हाचा अधिकार सोपविला असल्यामुळे निवडणूक आयोगाकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ७ ऑक्टोबरला त्यासंदर्भातील सुनावणी निवडणूक आयोगात होती, पण ती पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र तो निकाल लागण्यापूर्वीच आपली शिवसेना खरी यासाठी दोन्ही गटात प्रचंड चढाओढ सुरू आहे. येत्या काळात याचे उत्तर मिळेल का, याची प्रतीक्षा आहे.