फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा

फडणवीस, शिंदे, अजित पवारांची अमित शहांशी चर्चा

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील चर्चा दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे झाली. महाराष्ट्रात दणदणीत बहुमताने जिंकलेल्या महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अमित शहांची गुरुवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी अमित शहांनी एकनाथ शिंदेंशी स्वतंत्र चर्चा केली तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशीही चर्चा केली.

या तीन नेत्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनीही अमित शहा यांची भेट घेतली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डादेखील त्यावेळी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे हे थोड्यावेळापूर्वी बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. यावेळी दिल्लीत पोहोचताच त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. ‘कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं आहे’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यांच्या या सूचक विधानामुळे त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून चर्चा रंगलेली असताना मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण त्यात कोणताही अडथळा आणणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्रीपद जाणार यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र भाजपातून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अद्याप शिक्का उमटलेला नाही. अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

हे ही वाचा:

ममता बॅनर्जी यांचा ‘या’ मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला पाठींबा!

संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश

एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील

वक्फ बोर्डाकडून ११५ वर्ष जुन्या उदय प्रताप कॉलेजवर दावा

मुख्यमंत्रीपदाबरोबरच मंत्रिमंडळात कोण असणार, उपमुख्यमंत्रीपद कुणाला असे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत. त्याविषयीही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे कळते. एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. तर त्याआधी २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. २०१९ला त्यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्याची संधी होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्रीपद मिळविले होते. त्यामुळे फडणवीसांची मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या.

त्यामुळे पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा येईन या त्यांच्या वक्तव्याची पूर्ती झाल्याचे मानले जात आहे. शिवाय, त्यांचे मुख्यमंत्रीपद हुकल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री बनल्यावर ज्यांनी त्याची टर उडविण्याचा प्रयत्न केला, त्यांनाही एक सणसणीत उत्तर यानिमित्ताने मिळणार आहे.

 

Exit mobile version