‘दाऊदशी संबंध असणाऱ्यांचे समर्थन बाळासाहेबांची शिवसेना कशी करू शकते?’

‘दाऊदशी संबंध असणाऱ्यांचे समर्थन बाळासाहेबांची शिवसेना कशी करू शकते?’

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि सध्या गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे आपल्या ट्विटमुळे सध्या चर्चेत आहेत. आता आणखी एक नवे ट्विट करून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे सध्या तुरुंगात आहेत. दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तीशी व्यवहार केल्याच्या प्रकरणात त्यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. त्यावरून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

त्याआधी, त्यांनी अशाच अर्थाचे आणखी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणतात की, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू.

हे ही वाचा:

‘संजय राऊत, शरद पवार शिवसेनेच्या अवस्थेला कारणीभूत’

“आदित्य ठाकरे राऊतांसारखं बोलायला लागले तर भविष्य वाईट”

उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?

आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी

 

शिवसेनेशी फारकत घेताना एकनाथ शिंदे यांनी पहिल्याच दिवशी ट्विट करत आपली स्पष्ट भूमिका मांडली होती की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालत असून त्यांनी जो हिंदुत्वाचा विचार दिला तो आम्हाला मान्य आहे. थोडक्यात उद्धव ठाकरे यांनी ज्या हिंदुत्वाचा त्याग केला आहे, ते आम्हाला मान्य नाही. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील दरी आणखी वाढली. सोबतच एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्याही वाढू लागली. आता ५० आमदार त्यांच्यासोबत आहेत असे म्हटले जाते. शिवसेनेतील प्रमुख मंत्रीही आता एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत. नुकताच उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत आता निवडून आलेल्या मंत्र्यांमध्ये आदित्य ठाकरे हे एकमेव मंत्री शिल्लक राहिले आहेत.

Exit mobile version