मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रथमच जोरदार असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ४० आमदारांसह बाहेर पडल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, आम्ही गद्दार नाही असे सातत्याने सांगणारे एकनाथ शिंदे मालेगाव येथील भाषणात मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडले. जाहीरपणे काही गोष्टी बोलणार नाही. योग्य वेळी बोलेन. आता मुलाखतींचा सपाटा सुरू आहे. ज्या दिवशी माझी मुलाखत होईल तेव्हा या राज्यात, देशात भूकंप होईल, असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. त्या हिंदुत्वाशी कुणी प्रतारणा केली? सावरकरांबद्दल अपमान करणाऱ्या काँग्रेसवाल्यांविरोधात आम्हाला बोलता येत नव्हते, मग विश्वासघात कुणी केला? मुंबईत दाऊदने बाँबस्फोट घडविले. अवघ्या मुंबईला रक्तबंबाळ केले. त्याच्याशी मंत्रिमंडळातील मंत्र्याचे कनेक्शन निघाले त्याविरोधात बोलू शकत नव्हतो, मग विश्वासघात कुणी केला? हा विचार केला गेला पाहिजे. मलाही एकदा भूकंप करावा लागेल. तोंड उघडावे लागेल. कधी कुणाशी खालच्या पातळीला येऊन बोललेलो नाही. कारण बाळासाहेबांनी शिकवलं नाही. पण अन्यायाविरुद्ध पेटून उठा असे ते म्हणाले होते.
शिंदे म्हणाले की, आमच्या उठावाची ३३ देशांनी दखल घेतली. आणची भूमिका कुणाच्या विरोधात नव्हती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाची राष्ट्रभक्तीची जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका. वेगळे काही केले नाही. बाळासाहेबांनी कायम सांगितले काँग्रेस व राष्ट्रवादीला जवळ उभे करू नका ते शत्रू आहेत आमचे. जवळ करण्याची वेळ आली तर माझे दुकान मी बंद करेन. मग आम्ही काय चूक केली. बाळासाहेबांची भूमिका घेऊन आम्ही पुढे गेलो. आनंद दिघेंचे आदर्श पुढे नेला २४ तास काम करणे हाच आदर्श होता.
हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांच्या सत्यनारायण पूजेचा वाद न्यायालयात
संजय राऊतांची शिवीगाळ करत असतानाची ऑडियो क्लिप व्हायरल
आजपासून दिल्ली- देवघर विमान सेवा सुरु
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून सत्तेची मलई ओरपलीत तेव्हा कुठे होता मराठी बाणा?
शिंदेंनी उद्धव ठाकरे यांना जाब विचारला की, आम्ही काय केले? बंडखोरी केली? गद्दारी केली? आम्ही क्रांति घडविली. राज्यात आम्ही सगळ्यांनी अन्यायाविरुद्ध उठाव केला. बाळासाहेबांच्या भाषेत बंड केले. याची दखल महाराष्ट्राने देशाने नाही तर ३३ देशांनी घेतली. कोण आहे एकनाथ शिंदे? ५० लोक कोण आहेत? एवढा मोठा उठाव का होतो? याच्या मुळाशी जायला पाहिजे. कारणमीमांसा व्हायला पाहिजे. पण गद्दारीचा शिक्का आमच्या माथी मारला जातो. पण जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. हिंदुत्वाचा विचार आहे म्हणूनच जनतेने आम्हाला स्वीकारले. नाहीतर हजारो लोक सोबत आलेच नसते.
आम्ही वेगळे झालो तेव्हा आमच्यातील काही आमदार संपर्कात आहेत असे सांगितले जात होते. पळवून नेले म्हणून कांगावा करत होते. जीवाची बाजी लावून शिवसेनेला मोठे केले. १६-१८ वर्षापासून मेहनत घेतली आहे. पण आजा आमचे आईबाप काढले जात आहेत. कधी भेटलो आम्ही आईबापांना? परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो. वेळ काळ बघितला नाही. दिवसरात्र मेहनत घेतली. शिवसेना अशीच मोठी झाली नाही. बाळासाहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले त्यातून पक्ष मोठा झाला.
आता अगडम तगडम काम नाही
स्मिता ठाकरे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. काल बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे यानेही शुभेच्छा दिल्या. आज मी जास्त बोलणार नाही. का येत आहेत लोक. समर्थन मिळत आहे. सगळ्या समाजातून आम्हाला का समर्थन मिळते आहे. आम्ही बेईमानी, गद्दारी केली असती तर तोंडं उलट्या दिशेला गेली असती, असे एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आहे. सर्वसामान्यांना न्याय देणार. आम्ही चुकीची दुरुस्ती केली आहे. नरेंद्र मोदी गृहमंत्री यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे. आता उचलला फोन की काम झाले पाहिजे, अगडम, तगडम नाही, असेही ते म्हणाले.