लखनऊमध्ये दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा सुरू

सोबत आलेल्या आमदारांचे, शिवसैनिकांचे जल्लोषात स्वागत

लखनऊमध्ये दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा सुरू

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांच्याशी एकनिष्ठ आमदार, खासदारांची फळी अयोध्या दौऱ्यासाठी लखनऊला शनिवारी संध्याकाळी दाखल झाले. ढोल ताशे, बँडच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार व शिवसैनिकांचे दणदणीत स्वागत याठिकाणी करण्यात आले.

यावेळी लखनऊ विमानतळावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रभू रामचंद्रांच्या पावन झालेल्या या भूमीत मी आल्यानंतर प्रचंड उत्साह, जल्लोष प्रेम दिसते आहे. सर्व रामभक्तांचे आभार. प्रभू रमचंद्रांच्या चरणी मी नतमस्तक होतो. लखनऊ ते अयोध्यानगरीपर्यंत रामभक्तांनी जो माहोल बनवला आहे त्याबद्दल आभार.

ते म्हणाले की, अयोध्या हा श्रद्धेचा, अस्मितेचा विषय आहे. मुख्यमंत्री बनल्यावर समाधान वाटते आहे. इथे आल्यानंतर भगवा माहोल, हिंदुत्वाचा माहोल दिसत आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत भव्य मंदिर निर्माण व्हावे. ते स्वप्न पूर्ण होत आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतो.

हे ही वाचा:

आधी पित्त मग अजित पवार पत्रकारांवर खवळले…खात्री करून बातम्या द्या!

थोरले पवार अजितदादांच्या भूमिकेत; केली गांधी-ठाकरेंची बत्ती गुल

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याच्या फोन नंतर खळबळ, पोलीस सतर्क

बोनी कपूरची चांदीची भांडी जप्त, किंमत ३९ लाख

याआधी एकनाथ शिंदे हे एक मंत्री म्हणून अयोध्येला गेले होते पण मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अयोध्येला जात असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्री आमदारांसह पोहोचले आणि तिथे उपस्थित बँड व ढोल ताशे पथकाने त्यांचे जोरदार स्वागत केले.

मुख्यमंत्री आणि आमदार दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी शनिवारी रवाना झाले. रविवारी सकाळी ते अयोध्येत जाणार आहेत. शनिवारी रात्री ते लखनऊला थांबणार होते. मुंबई विमानतळावर दुपारपासून सगळ्या आमदारांची लगबग पाहायला मिळाली. त्यानुसार विमानाने ते संध्याकाळी लखनऊला रवाना झाले. सर्व आमदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. आमदार प्रकाश सुर्वे यांनी खास स्वतःच्या मोबाईलमधून विमानातील चित्रण केले. जय श्रीरामच्या घोषणाही विमानात दिल्या जात होत्या. सगळ्या आमदारांवरून सुर्वे यांच्या मोबाईलचा कॅमेरा फिरत होता आणि सगळे नमस्कार करत अभिवादन करत होते.

रविवारी सकाळी रामलल्लाचे दर्शन घेऊन शरयू नदीच्या किनारी आरतीचे आयोजनही करण्यात आले आहे. तिथे मुख्यमंत्री व सगळे आमदार आरतीत सामील होतील. उत्तर प्रदेश सरकारनेही सगळी चोख व्यवस्था या पाहुण्यांसाठी केली आहे. रविवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भोजनाचा आस्वादही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार घेणार आहेत.

फडणवीसही जाणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील अयोध्येला जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी त्याला दुजोरा दिला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचे सर्व नियोजन नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे असून या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शरयू नदी किनारी पाहणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी आयोध्या येथील शरयू नदीची महाआरती करणार आहे. त्यांच्या याच दौऱ्याचे सर्व नियोजन करण्याची जबाबदारी ही नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांवरती आहे. कारण यापूर्वी ज्यावेळी असे कार्यक्रम आयोजित झाले. त्यावेळी याच नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व नियोजन केले होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर दिली आहे. महाआरतीच्या पूर्व संध्येला शनिवारी शरयू नदीच्या आरतीची पूर्व तयारी करण्यात आली.

Exit mobile version