एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!

एकनाथ शिंदे यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, फडणवीस उपमुख्यमंत्री!

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राजभवनात शपथ ग्रहण केली. एकनाथ शिंदे यांचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जाहीर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त झाले होते पण तसाच ट्विस्ट स्वतः फडणवीस यांच्याबाबतही आला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तोही एक धक्का ठरला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या दोघांनाही शपथ दिली.

खरेतर, गेल्या काही दिवसांत सगळ्याच घडामोडी आश्चर्यजनक आणि धक्कादायक घडत गेल्या आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यासाठी आले तेव्हा ते उपमुख्यमंत्री होतील आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे जबाबदारी स्वीकारतील असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्षात सगळेच चित्र बदलले. शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले.

शपथविधीची तयारी सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत सहभागी व्हावे असे म्हटले होते. त्यानुसार फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद भूषवावे असे ठरले. त्याप्रमाणे अखेरच्या वेळेस फडणवीस यांनी ही शपथ ग्रहण केली. गृहमंत्री अमित शहा यांनीही फडणवीस यांनी सत्तेत सहभागी व्हावे असे ट्विट केले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चर्चा केल्याचे वृत्त होते. नंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर फडणवीस यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छाही दिल्या.

देवेंद्र फडणवीस यांनीही हा निर्णय स्वीकारल्याचे ट्विट केले. एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे, असे ट्विट फडणवीस यांनी केले.

गेले काही दिवस महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले होते. शिवसेनेतील ३५-४० आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत वेगळे झाल्यानंतर सत्तेतील महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाले. तरीही न्यायालयात जाऊन सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न केला गेला पण अखेरीस मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांनी पायऊतार होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे गुरुवारी सकाळी मुंबईत आले.

Exit mobile version