मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे जाहीर सभा झाली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा बांधवांना त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला मुदतीची आठवण करून दिली.
“मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा, अशी मराठा समाजाची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे केवळ १० दिवस उरलेत. या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. तसेच मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. शांततेत आंदोलन करा. आरक्षण कसं मिळत नाही हे मराठा समाज बघून घेईल. जर २४ ऑक्टोबरच्या आत आरक्षण दिलं नाही तर टोकाचं उपोषण करणार. एक तर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल,” असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले. तसेच पुढची दिशा २२ ऑक्टोबर रोजी सांगितली जाईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
“मराठा समाज एक होत नाही असं बोलणाऱ्यांना गर्दीने उत्तर दिले आहे. कोण म्हणतो मराठा एक होत नाही. यांना ते समाजावून सांगा आरक्षण घ्यायला आला की कशाला आला आहात. आपल्या मराठा समाजाची मूळ मागणी आरक्षण आहे. नेमकं कोण आहे, जे मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याच्या मध्ये येत आहे? नेमक कोण आरक्षण देत नाही हे ऐकण्यासाठी कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत. सरकारला विनंती आहे की, तुमच्या हातात ४० दिवसांपैकी १० दिवस हातात उरलेले आहेत. राहिलेल्या १० दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्यावे. जर दिलं नाही तर पुढची जबाबदारी सरकारची असेल.” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
हे ही वाचा:
कॅनडात तीन हिंदू मंदिरांची तोडफोड आणि चोरी
भारत पाक सामन्यात स्विगी, झोमॅटोकडून भारताला अनोख्या शुभेच्छा
इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये हमासच्या एरियल फोर्सचा प्रमुख ठार
मणिपूर विद्यार्थी हत्याकांड प्रकरणातील मास्टरमाइंडला पुण्यातून अटक
“सरकारला जाहीरपणे विनंती करतो की, मराठा समाजासाठी गठीत केलेल्या समितीचे काम बंद करा. पाच हजार पानांचा पुरावा मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी पुरेसा आहे. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे अद्याप मागे घेतलेले नाहीत. ते मागे घ्यावे,” असे आवाहन त्यांनी सरकारला केले.