भावी पंतप्रधानांचे ‘मांडे’

भावी पंतप्रधानांचे ‘मांडे’

लोकसभा निवडणुकांना तीन वर्षांचा काळ बाकी असला तरी विरोधी पक्षांनी भाजपाला पर्याय देण्यासाठी जुळवाजुळव सुरू केलेली आहे. परंतु बंद पडलेल्या गाडीला सुरू करण्यासाठी अनेक बाजूने धक्का देणाऱ्या मदतकर्त्यांसारखी विरोधी पक्षांची अवस्था झालेली आहे. मोदींना पर्याय तर द्यायचा आहे, परंतु तो पर्याय मीच आहे अशी ठाम खात्री असलेल्या नेत्यांचा या गर्दीत भरणा आहे. राहुल गांधी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे गेली अनेक वर्षे पंतप्रधान पदाच्या प्रतिक्षेत आहेत. पंतप्रधान पदासाठी आवश्यक संख्याबळ आपल्याकडे नसल्यामुळे आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही अशी ‘प्रांजळ’ कबुली पवारांनी अनेकदा दिली आहे. परंतु त्यांच्या राजकारणाची जातकुळी माहीत असलेले या कबुलीवर विश्वास ठेवायला तयार नाहीत. मूठभर क्षमतेच्या जीवावर पंतप्रधान बनण्याच्या ‘जुगाड’मध्ये असलेले ते एकटेच नाहीत, ही त्यांची मुख्य अडचण आहे.  प.बंगालमधील निवडणुकीतील विजयानंतर देशातील मोदीविरोधकांनी ममतांना डोक्यावर घेतले. भाजपाला धूळ चारल्याबद्दल काँग्रेसनेही त्यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे पंतप्रधान पदासाठी आपणच सर्वात योग्य उमेदवार आहोत, असे ममता बॅनर्जी यांना वाटू लागले आहे. त्यामुळे मोदींना एकापेक्षा जास्त पर्याय निर्माण झाले असून ते एकमेकांच्या तंगड्या ओढण्याचे काम करत आहेत. ममता बॅनर्जी अलिकडेच मुंबईत येऊन गेल्या. भाजपाविरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तमाम पुरोगाम्यांनी त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून त्यांच्या राष्ट्रीय महत्वाकांक्षेला फुंकर घातली आहे. भाजपाशी रस्त्यावर येऊन दोन हात करण्याची क्षमता फक्त ममतांमध्ये आहे, यावर देशातील तमाम डावे आणि पुरोगाम्यांचा विश्वास दिवसागणिक वाढतो आहे.

पुरोगामी मंडळींशी चर्चा केल्यानंतर ममता  ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटल्या. या भेटीनंतर बोलताना ममता यांनी ज्याप्रकारे काँग्रेसची उरलीसुरली इज्जत मोडीत काढली त्यावरून या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली असावी याची कल्पना करता येऊ शकते. ‘यूपीए’चे अस्तित्व उरले नसून देशात काँग्रेस हा पर्याय ठरू शकत नाही, असे ममता म्हणाल्या. ममतांनी जाहीरपणे पाणउतारा केल्यानंतर हा अपमान खरे तर काँग्रेस नेत्यांना झोंबायला हवा होता. परंतु काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान होत असताना तोंडात मळी भरल्यासारखे गप्प बसणारे शिवसेनेचे नेतृत्व काँग्रेसच्या अपमानामुळे मात्र पेटून उठल्याचे दिसले. या अपमानाबाबत ‘सामना’च्या अग्रलेखात आज चरफड व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय मोदींना पर्याय देता येणार नाही, असा अग्रलेखाचा सूर आहे. महाराष्ट्रात काँग्रेससोबत सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसला नेहरु-गांधी परिवाराबद्दल प्रेमाचे भरते आलेले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून ही निष्ठा सातत्याने व्यक्त होत असते. राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळून सुद्धा भाजपाला सत्तेबाहेर ठेवणे शक्य झाले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अनैसर्गिक आघाडीची मोट बांधून तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाने ते ‘करून दाखवले’. हा प्रयोग देशपातळीवर राबवता येईल, असे मांडे शिवसेनेचे नेतृत्व मनातल्या मनात खात असते.

अनेक गृहितकांच्या आधारावर हा होरा मांडण्यात येत आहे. २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भक्कम बहुमत मिळवून सत्तेवर आलेला भाजपा सलग तिसऱ्या वेळी बहुमत गाठू शकणार नाही, या आशेवर हा खेळ सुरू आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर महाराष्ट्रात झालेला प्रयोग केंद्रात राबवता येईल असा शिवसेनेचा होरा आहे. जेव्हा अशी जुळवाजुळव शक्य होते, तेव्हा पंतप्रधान पदाची लॉटरी कोणालाही लागू शकते, असं इतिहास सांगतो. इंद्रकुमार गुजराल, चंद्रशेखर, एच.डी.देवेगौडा, मनमोहन सिंग यांना जी लॉटरी लागली ती आपल्यालाही लागू शकते या आशेवर ममता, शरद पवार, राहुल गांधी आदी नेते आहेत. ‘जग आशेवरच चालते’ असे म्हणतात ते काही खोटे नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही अशी संधी मिळाली तरी त्यांची ना नसेल. संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना त्याचे सुतोवाच अनेकदा केलेले आहे.

परंतु केंद्रातल्या सत्तासंघर्षाची गणिते सोपी नाहीत. राहुल गांधी यांचा अहंकार ममतांपेक्षा कमी नाही. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियांका वाड्रा यांच्यात नेतृत्वासाठी सुप्त संघर्ष सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सपा आणि काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता नसताना ते केंद्रात एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.

एकेकाळी पक्षांच्या आघाडीची मोट बांधून सरकार आले तर आपल्याही पंतप्रधान होता येईल, अशी आशा बाळगणाऱ्या बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांची अलिकडे कुठे चर्चाही होताना दिसत नाही. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या कोलाहलात बसपाचा आवाजही ऐकू येत नाही, असे चित्र आज तरी दिसते आहे.

वर्षोनुवर्षे एकाच कुटुंबाकडे पक्षाचे आणि सत्तेचे नेतृत्व असलेले नेते मोदींना पराभूत करून पंतप्रधान होण्याची स्वप्न बघत आहेत. मोदींचा पराभव हाच त्यांचा अजेंडा आहे, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे एवढेच त्यांचे उद्दीष्ट आहे. परंतु या कोत्या उद्दीष्टासाठी एकत्र येण्याची त्यांची तयारी नाही. कारण त्यांचे अहंकार त्यांच्या उद्दीष्टापेक्षा मोठे आहेत.

हे ही वाचा:

कोस्टल रोडच्या कामातही बीएमसीचा भ्रष्टाचार?

न्यूझीलंडच्या अजाझ पटेलने नोंदविला १० बळींचा विक्रम

काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकत नाही; संजय राऊतांचा ममतांना टोला

सावरकरांचा अपमान केल्यामुळे फडणवीसांची साहित्य संमेलनाकडे पाठ

 

कडबोळे सरकार केंद्रात आले तर सत्तेची सर्कस बनते. किंग कपाळाचा घाम पुसत राज्य करतो आणि पाठिंबा देणारे किंगमेकर मातब्बर होतात. राजकारणाचा हा खेळ डोक्यात गेल्यामुळे देशाच्या जनतेने मोदींना स्पष्ट बहुमत दिले. त्यांच्या सक्षम नेतृत्वात देश कंगालीच्या अवस्थेतून बाहेर पडला, भ्रष्टाचारमुक्त झाला. त्यातून बेरोजगार झालेले,  बाजार उठलेले, दुकाने बंद झालेले, सत्ता आली तर वाटमारी पुन्हा सुरू होईल या आशेने एकत्र आलेले नेते एकमेकांचा आधार घेत मोदींच्या पराभवाची स्वप्ने पाहातायत. परंतु ही मोट बांधण्याचा डाव सुरू होण्यापूर्वीच उधळला जातोय हाच ‘सामना’च्या अग्रलेखाचा अन्वयार्थ. हीच सगळ्या भावी पंतप्रधानांची व्यथा आहे. स्पष्ट शब्दात सांगायचे तर देशात २०२४ मध्ये मोदी हॅटट्रीक करतायत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version