ईडीच्या कोठडीत असणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडी आणखी एक दणका दिला आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला ईडीकडून लवकरच तिसरं समन्स पाठवलं जाणार आहे. फराझ मलिकची कुर्ला येथील गोवाला बिल्डिंगच्या व्यवहारांबद्दल चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले जाणार असल्याचे ईडीने स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक याला समन्स बजावले होते. मात्र, तो ईडीसमोर हजर झाला नाही. त्यानंतर ईडीने दुसरे समन्स दिले होते. मात्र, त्यानंतरही फराझ चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता त्याला लवकरच तिसरं समन्स पाठवलं जाणार असल्याचे ईडीने सांगितले आहे. फराझ याची कुर्ला येथील गोवाला बिल्डिंगच्या व्यवहारांबद्दल चौकशी होणार आहे.
दरम्यान मंगळवार, १५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना चांगलाच दणका दिला. ईडीची कारवाई कायदेशीरच असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती.
हे ही वाचा:
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
….म्हणून भाजपाच्या खासदारांच्या मुलांना तिकीट नाही!
आजपासून १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण
महाराष्ट्र गुजरात सीमावाद लवकरच संपणार
कुर्ल्यातील तब्बल तीन एकर जागा अवघ्या तीस लाखात नवाब मलिक यांनी विकत घेतली. या खरेदी विक्रीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने ही जागा विकत घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्या संदर्भात पुरावे दिले होते. त्यानंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली होती.