संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अटक केली असून, सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. आज पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ केली आहे. यादरम्यान, या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहे.

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने अटक करत चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. आज, ४ ऑगस्ट रोजी राऊतांची चार दिवसांची कोठडी संपली. त्यामुळे संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने सुनावणीत राऊतांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात वर्षा राऊत यांच्या खात्यातून अनके व्यवहार झाल्याचे ईडी वकिलाने सांगितले.

अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या खात्यावर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. या चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी शुक्रवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याआधी वर्षा राऊत जानेवारीत चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर झाल्या होत्या.

हे ही वाचा:

संजय राऊत यांची कोठडी ४ दिवस वाढली

टोलसंबंधी नितीन गडकरींनी केली मोठी घोषणा

कर्माची फळं भोगणारे पार्थ चॅटर्जी खात असत अडीच लाखांची फळे

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा दबदबा; १८ पदकांसह भारत सातव्या क्रमांकावर

दरम्यान, संजय राऊतांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना आपली मालमत्ता जाहीर केलेली. त्यामध्ये त्यांनी वर्षा राऊत यांची मालमत्तासुद्धा जाहीर केली होती. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, ३९ लाख ५९ हजार ५०० रुपयांचं असं एकूण ७२९ पूर्णांक ३० ग्रॅम सोन आणि १ लाख ३० हजार किमतीची चांदी आणि एक वाहन वर्षा राऊतांकडे आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात वर्षा राऊत यांची कमाई २१ लाख ५८ हजार ९७० इतकी होती. दादरमधे वर्षा राऊत यांच्या नावे एक घर आहे. वर्षा राऊत यांच्या नावावर मुंबईत तीन मालमता आहेत. या सगळ्याची किंमत एकूण ५ कोटींच्या घरात आहे.

Exit mobile version