नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले आहे. चौकशीसाठी २१ जुलै रोजी त्यांना हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वी त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे त्या उपस्थित राहू शकल्या नव्हत्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही या प्रकरणी सहा दिवस ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीकडून नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला होता. मात्र, कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सोनिया गांधी यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यामुळे सोनिया गांधी यांनी ईडीला पत्र लिहून त्या पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांची हजेरी काही आठवडे पुढे ढकलण्याची मागणी केली होती. ईडीनेही ही मागणी मान्य करत सोनिया गांधी यांना चार आठवड्यांचा कालावधी दिला होता. हा कालावधी २१ जुलैरोजी संपत असल्यामुळे ईडीने त्यांना पुन्हा चौकशीचे समन्स बजावले आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग सहा दिवस चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेस नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात निर्देशने करण्यात आली होती.
हे ही वाचा:
सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र
१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
झारखंडच्या ‘ज्या’ शाळांनी नियम बदलले, त्यांच्यावर होणार कारवाई
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर
‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र काढले होते. २००८ मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.