केजरीवाल यांना ईडीचे तिसऱ्यांदा समन्स

३ जानेवारीपूर्वी हजर राहण्याचे आदेश

केजरीवाल यांना ईडीचे तिसऱ्यांदा समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना मद्यघोटाळ्याप्रकरणी ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना ३ जानेवारीपूर्वी हजर राहण्यास सांगितले आहे.

ईडीने १८ डिसेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून २१ डिसेंबर रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास नकार देत ते १० दिवसांच्या विपश्यनेसाठी रवाना झाले. केजरीवाल यांनी या प्रकरणी ईडीवर टीका केली होती. हे समन्स बेकायदा आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप करून आपल्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही, याचा पुनरुच्चार केजरीवाल यांनी केला. ‘मी कोणतेही कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे. मात्र ईडी समन्स हे बेकायदा आणि राजकीय हेतूने प्रेरित आहे. हे समन्स मागे घेतले पाहिजे. मी माझ्या संपूर्ण जीवनात प्रामाणिक आणि पारदर्शकतेचा अवलंब केला आहे. माझ्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही,’ असे केजरीवाल यांनी गुरुवारीच स्पष्ट केले होते.

केजरीवाल यांना दुसऱ्यांदा समन्स पाठवल्यानंतर त्यांनी ईडीला सहापानी उत्तर लिहून ही संपूर्ण कारवाईच बाहेरील शक्तीने प्रेरित आणि त्यांच्या आदेशाबरहुकूम होत असल्याचे नमूद केले होते. ‘हे समन्स पाठवण्यासाठी जी वेळ साधली आहे, त्यावरून हे समन्स कोणतेही उद्दिष्ट किंवा तर्कशुद्ध मापदंडावर आधारित नाही, तर निव्वळ प्रचार म्हणून देशातील बहुप्रतीक्षित संसदीय निवडणुकीच्या शेवटच्या काही महिन्यांत खळबळजनक बातम्या निर्माण करण्यासाठीच केला जात आहे, या माझ्या विश्वासाला बळ मिळाले आहे,’ असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.

हे ही वाचा:

मराठा समाजाला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ ८४ सेकंदांचा मुहूर्त

कर्नाटकमधल्या काँग्रेस सरकारला हिजाबचा पुळका; बंदी उठवण्याच्या सूचना

खलिस्तान समर्थकांकडून अमेरिकेतील हिंदू मंदिरावर मोदींविरोधात लिहिला आक्षेपार्ह मजकूर

दिल्ली मद्यधोरणात घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना ऑक्टोबरमध्ये पहिले समन्स पाठवण्यात आले होते. तर, याच वर्षी सीबीआयनेही त्यांची चौकशी केली होती. मात्र सीबीआयने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव आरोपी म्हणून नमूद नव्हते. याच प्रकरणात आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य नेते संजय सिंह अटकेत आहेत.

Exit mobile version