सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

सोनिया गांधींना ईडीचे पुन्हा समन्स

नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. ईडीने त्यांना २३ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

या प्रकरणी ईडीने सोनिया गांधी यांना ८ जून रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हाच सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली त्यामुळे सोनिया गांधी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ मागितला होता.

दरम्यान, याच प्रकरणी ईडीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही समन्स बजावले असून १३ जून रोजी राहुल गांधींना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, समन्स बजावल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याची टीका केली असून १३ जूनला राहुल गांधींच्या चौकशीच्या दिवशी काँग्रेस पक्ष शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. दिल्लीसह देशभरातील ईडी कार्यालयांसमोर सत्याग्रह करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच पक्षाने दिल्लीतील ईडी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

यावरून भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर सणसणीत टीका केली आहे. “ईडीने चौकशीला बोलावल्या प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या समर्थनासाठी काँग्रेस देशभरातील ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहे. गांधी माता पुत्र कायद्यापेक्षा मोठे आहेत असे काँग्रेसला वाटते काय?” असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

हनुमान ‘चाळीसा’ भाजपाला फळली; धनंजय महाडिक विजयी

‘निवडणूक लढवण्यासाठी नाही जिंकण्यासाठी लढवली’

“फूल” टू कमाल

संविधान ‘बचाव’वाल्यांचा उच्छाद

‘द असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ या कंपनीद्वारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र काढले होते. २००८ मध्ये हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर, नव्याने स्थापन झालेल्या ‘यंग इंडिया’ कंपनीने २०१० मध्ये ते विकत घेतले. काँग्रेसने ‘नॅशनल हेराल्ड’ला ९० कोटींचे कर्ज दिले होते. ‘द असोसिएटेड जर्नल’ची संपत्ती हडपण्यासाठी ते अवघ्या ५० लाखांत खरेदी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘यंग इंडिया’ कंपनीचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर्स सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नावावर आहेत. भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी २०१३ साली दिल्ली सत्र न्यायालयात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात आयकर विभागाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी सुरु केली होती. गांधी कुटुंबीयांकडे नॅशनल हेराल्डची मालकी असताना फसवणूक आणि आर्थिक अनियमितता झाल्याचे या तक्रारीत म्हटले होते.

Exit mobile version