पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. यानुसार अभिषेक बॅनर्जी यांची गुरुवार, ९ नोव्हेंबर रोजी चौकशी होणार आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीकडून अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. यापूर्वी ३ ऑक्टोबरलाही त्यांना समन्स बजावून बोलावण्यात आले होते.
गेल्या ३ ऑक्टोबर रोजी शिक्षक भरती घोटाळ्यात अभिषेक यांची चौकशी होणार होती. परंतु, टीएमसीचे आंदोलन असल्यामुळे अभिषेक बॅनर्जी ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नव्हते. यानंतर ईडीने त्यांना बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी नव्याने समन्स बजावले आहे. ईडीने अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावण्याची ही पहिलीच वेळ नाही. कोळसा घोटाळा आणि प्राण्यांची तस्करी प्रकरणी ईडीने त्यांना यापूर्वी अनेकदा समन्स बजावले आहे.
प्राथमिक शाळेतील नोकरीच्या घोटाळ्यातील पैशांच्या व्यवहाराच्या तपासासंदर्भात त्यांना यापूर्वीच नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. अभिषेक बॅनर्जी अनेकवेळा ईडीसमोरही हजर झालेले नाहीत. त्याचवेळी ईडीने अभिषेक बॅनर्जीची पत्नी रुजिरा यांचीही चौकशी केली आहे. मात्र, ही चौकशी कोळसा घोटाळ्याबाबत होती ज्यात काही परदेशी बँकांच्या खात्यांची माहिती मागवण्यात आली होती.
हे ही वाचा:
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण
अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी
बरखास्त श्रीलंका क्रिकेट बोर्ड न्यायालयाकडून पुनर्स्थापित
यापूर्वी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला कोळसा घोटाळा प्रकरणात समन्स बजावण्यात आले होते. सीबीआयच्या नोव्हेंबर २०२० च्या एफआयआरनंतर ईडीने हा खटला दाखल केला होता. आसनसोलच्या आसपासच्या ईस्टर्न कोलफील्डच्या काही खाणींमधून कोट्यवधी रुपयांचा कोळसा चोरीला गेल्याचा सीबीआयचा आरोप आहे.