भावना गवळींना ईडीचा दुसरा समन्स!

भावना गवळींना ईडीचा दुसरा समन्स!

शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचा ससेमिरा त्यांच्या मागे आहे. गवळी यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले असून येत्या २० ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ईडीने पाठविलेले दुसरे समन्स आहे. मनी लाँडरींगच्या आरोपाप्रकरणी हे समन्स बजावण्यात आले असून यामुळे भावना गवळींच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये भावना गवळी यांना समन्स बजावण्यात आला होता. तसेच त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता भावना गवळींना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यातील महामार्गाच्या कामांमध्ये शिवसैनिक आडकाठी करत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. गवळींनी ५५ कोटींचा बालाजी पार्टीकल बोर्ड हा कारखाना २५ लाखात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर महिला प्रतिष्ठान या ट्रस्टला कंपनीमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी सईद खानला अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

सामाजिक न्याय विभागाच्या उपायुक्ताच्या घरी सापडले एक कोटी

‘संजय राऊत यांचे गांजावर इतके प्रेम बरे नाही!’

गवळींच्या शिक्षण संस्था आणि कृषी उत्पादन संस्थांवर ईडीने छापेमारी केली होती. जवळपास नऊ ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. त्यानुसार ईडीने त्यांना १५ दिवसांची मुदतही दिली होती. आता ही मुदत संपत असून भावना गवळींना दुसऱ्यांदा ईडीने समन्स जारी केला आहे. येत्या २० ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version