राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे, शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज माफ करणे, गिरणी खरेदीसह अनेक विषयांसाठी त्यांची चौकशी झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण पाचशे कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.
आतापर्यंत शिंदे पिता पुत्रांची ईडीकडून तीन वेळा चौकशी झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ईडीकडे या पिता, पुत्राची तक्रार केली होती. शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात याविरोधात आवाज उठवणार असल्याचे संजय कोकाटे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना शिवसेनच्याच नेत्याने आघाडी सरकारमधील नेत्याची ईडीकडे तक्रार केली आहे.
हे ही वाचा:
राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या
अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी
शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण
गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा
या प्रकरणाबद्दल आमदार शिंदे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र बबनराव शिंदे यांना ईडीने बजावलेल्या दोन समन्सचे फोटो माध्यमांच्या हाती सापडले आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून ही चौकशी सुरु असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढणे ते कर्ज माफ करणे तसेच गिरणी खरेदीसह अनेक विषयांत त्यांची चौकशी झाली आहे.