महाराष्ट्राचे परिवहन मंत्री शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने धाड टाकली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या कारवाईतून ईडीच्या हाती काय लागणार आणि या तपासातून काय पुढे येणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान अनिल परब यांच्या विरोधात ईडी मार्फत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार, २६ मे रोजी अनिल अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने धाड टाकली. मुंबई, पुणे, रत्नागिरी इथल्या एकूण सात ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये परब यांचे शिवालय हे शासकीय निवासस्थान, बांद्रा येथील निवासस्थान, दापोली येथील रिसॉर्ट यांचा समावेश आहे. या सोबतच परब यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेचे नेते यशवंत जाधव ईडीच्या रडारवर
टेक्सासमध्ये शाळेत झालेल्या गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू
आंध्रप्रदेशमधील नामांतराचा वाद विकोपाला; आमदाराचे घर पेटवले
अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे लवकरच ईडी त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर अनिल परब यांना सुद्धा ईडीमार्फत अटक होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
ठाकरे सरकारमधील अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर अनिल परब यांना अटक झाली तर अटक होणारे महाराष्ट्र सरकार मधील ते तिसरे मंत्री असतील. अनिल परब शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल परब हे ईडीच्या रडारवर होते. दापोली येथील परबांच्या रिसॉर्टच्या प्रकरणातही गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते. त्यानंतर आता यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी झाल्यानंतर अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.