मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने धडक कारवाईला सुरुवात केली असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांच्या संबंधित ईडीने धाडसत्र सुरू केले आहे. बुधवार, २१ जून रोजी सकाळी सकाळीच छापेमारी सुरू केली असून एकूण १० ठिकाणी ईडीने सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्या प्रकरणी ईडीने ही छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे विभागाकडून केली जात असतानाच आता ईडीने यात कारवाई सुरू केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सुजित पाटकर हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यांची लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्विसेस ही कंपनी आहे. कोविड काळात वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम या कंपनीला देण्यात आलं होतं. पण त्यात मोठा आर्थिक घोटाळा झाला होता. या प्रकरणाला भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी वाचा फोडली होती. त्यानंतर या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाला होता. दरम्यान, हा तपास सुरू असतानाच ईडीने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करून सुजित पाटकर यांना दणका दिला.
हे ही वाचा:
मेकअप आर्टिस्टचा पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला, हत्येचा संशय
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी विधान भवनात योग दिवस केला साजरा
लष्कर ए तोयबाच्या साजीद मीरला काळ्या यादीत टाकण्यासाठी कुरापती चीनचा नकार
‘गद्दार दिना’शी राष्ट्रवादीचा काय संबंध?
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीही ईडीच्या रडारवर
त्यानंतर बुधवारी ईडीने सुजीत पाटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी संबंधित १० हून अधिक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. दरम्यान ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती सुरज चव्हाण यांच्या घरातही ईडीने धाड टाकली आहे. चेंबूरमधील त्यांच्या निवास्थानी चार ते पाच अधिकारी पोहचल्याची माहिती आहे. तसेच मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या घरीही धाड टाकण्यात आली आहे. लाईफलाईन कंपनी घोटाळा प्रकरणीचं ही धाड असल्याचे सांगण्यात येत आहे.