‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

शिवसेना नेते अनिल परब यांच्या ईडी नोटीसची चर्चा सुरु असतानाच आणखी एका शिवसेना नेत्यावर ईडीने धाडी टाकल्या आहेत. शिवसेनेच्या यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. भाजपाने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्याची तक्रार ईडीकडे केली होती. ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकल्या. खासदार भावना गवळी यांच्याविरोधात असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू असल्याची माहिती आहे. ईडीच्या अनेक टीम वाशिममध्ये दाखल झाल्या.

ईडीने वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे या धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे. रिसोड येथील उत्कर्ष प्रतिष्ठाना, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस कॉलेज, भावना ऍग्रो प्रोडक्ट सर्व्हिस लिमिटेड या सर्व कंपन्यांवर ईडीने धाडी टाकल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत. यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान दहा दिवसापूर्वी किरीट सोमय्या हे वाशिम दौऱ्यावर होते. त्यावेळ सोमय्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची पाहणी करण्याकरिता जात होते. त्यावेळी भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजपा आमदार राजेंद्र पाटणी होते.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारची गळचेपी फार काळ चालणार नाही

येमेनच्या सैन्यावर मोठा हल्ला

भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे. या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं. मात्र, ४३ कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

Exit mobile version