नागपूर येथील प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. गुरुवार, ३१ मार्च रोजी सकाळपासूनच सतीश उके यांच्या नागपूरमधील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र, त्यांच्या घरावर सुरू असलेली ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणासाठी सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सतीश उके हे हायप्रोफाईल वकील आहेत.
सतीश उके यांच्या पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. सतीश उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान आणि पोलिसांचा बंदोबस्त आहे. सतीश उके यांना भेटायला आलेल्या वकिलांना ईडीने त्यांची भेट घेऊ दिलेली नाही. तर ही सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचे सतीश उके यांच्या वकिलांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
व्हीआयपींच्या सेवेत गुंतलेल्या वन अधिकाऱ्यांना कर्तव्याचा विसर!
‘नवाज शरीफ यांनीच भारताला अजमल कसाबचा पत्ता दिला’
मेघालयचे म्हणताहेत असा मी ‘आसामी’
आदित्य ठाकरेंच्या सभेत फडणवीस?
सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. नाना पटोलेंचा गावगुंड ‘मोदी’ याला सतीश उके यांनीच पत्रकार परिषद घेऊन समोर आणले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर गेले होते. सतीश उके यांनी त्यावेळी संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपूरमध्ये तीन वेळा त्यांची भेट झाली होती.