मुंबई आणि ठाण्यात ईडी आणि आयकर विभागाची मोठी कारवाई सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात ईडीची छापेमारी सुरू आहे. कारवाईसाठी मंगळवार, २२ मार्च रोजी ईडीचे अधिकारी कुर्ला परिसरात पोहोचले आहेत. नवाब मलिक यांच्याशी संबंधित प्रकरणी ईडीचे अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती आहे.
कुर्ला येथील गोवावाला कंम्पाऊंडमध्ये ईडीचे अधिकारी पोहोचले असून अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफ जवानांचा ताफा आहे. या छापेमारीनंतर नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सध्या मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत आहेत. नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यांच्यावरती अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी पैशांचा व्यवहार केल्याच्या आरोपांवरुन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
बुलडोझरच्या भीतीने आरोपीने केलं आत्मसमर्पण
कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी
‘त्या’ धावणाऱ्या मुलावर झाले आनंद महिंद्र फिदा
भाजपाला मतदान केल्यामुळे महिलेला तिहेरी तलाकची धमकी
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने आधी ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि २१ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. तर सोमवार, २१ मार्च रोजी पुन्हा एकदा नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ४ एप्रिल पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली. नवाब मलिक यांनी यापूर्वीही ईडीची कारवाई कायदेशीर नसल्याचे म्हटले होते. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्यच असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना दणका दिला होता.