अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने २१ एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

हे ही वाचा:

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे

दरम्यान, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Exit mobile version