मुंबई महापालिकेने करोना काळात डेड बॉडी बॅग खरेदीत कथित घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ईडीने यापूर्वी बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, प्रकृतीचा कारणामुळे त्यांनी इतर दिवशी चौकशीसाठी बोलावण्याची विनंती केली होती. त्यानुसार ईडीकडून २३ नोव्हेंबर रोजी किशोरी पेडणेकर यांनी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या धर्तीवर ईडीने ECIR दाखल केले होते. माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) आणि माजी महापालिका उपायुक्त (खरेदी/सीपीडी) आणि इतरांची देखील ECIR मध्ये नावे आहेत. यानंतर ईडीने किशोरी पेडणेकर आणि मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले.
काही दिवसापूर्वी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र त्यांनी दोन आठवड्याची वेळ मागितली होती. त्यानंतर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नवीन समन्स देऊन २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची ईडीने जवळपास पाच तास चौकशी केली.
हे ही वाचा:
सौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट
वरुणराजाची राजधानी दिल्लीवर कृपा! AQI पातळी ४०० वरून १०० वर
‘भिवंडीतील पडघा हे गाव सीरियासारखे! शरियाचे होते पालन…’
बेस्ट, एसटी, पालिका कर्मचाऱ्यांची झाली दिवाळी गोड!
करोना काळात मृतदेहांसाठी खरेदी करण्यात आलेल्या बॅग्स मुंबई महापालिकेने बाजार भावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याचा आरोप आहे. करोनामुळे काळात मृतदेहांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कथित घोटाळा प्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर आणि इतर वरिष्ठ नागरी अधिकार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ (लोकसेवक किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासाचा भंग करणे), ४२० (फसवणूक) आणि १२० ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.