राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी, आयकरचे २० अधिकारी; छापासत्र सुरू

नातेवाईक, व्यावसायिक भागीदारांच्या घरीही धाडी

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी, आयकरचे २० अधिकारी; छापासत्र सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी तसेच आयकर विभागाने पहाटेपासून धाडी घातल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. मुश्रीफांच्या घराबरोबरच त्यांच्या नातेवाईकांच्या घरावरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. मुश्रीफ यांचे व्यावसायिक भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावरही कारवाई केली जात आहे.

कोल्हापूर, कागल येथील हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी आणि आयकर खात्याचे अधिकारी सकाळीच धडकले. पहाटे ६.३० वाजताच ईडीने ही कारवाई केली. तेव्हापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी आहेत. त्यांच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नुकतेच तुरुंगातून सुटलेले नेते अनिल देशमुख, सध्या तुरुंगात असलेले नेते नवाब मलिक आणि आता हसन मुश्रीफ यांच्यावर ही कारवाई झाली आहे. मुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप आहेत.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील चर्चा सुरू झाली होती. त्यानंतरच ही छापेमारी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी याआधी राष्ट्रवादीव्यतिरिक्त शिवसेनेच्या नेत्यांवरही आरोप केले आहेत. अनिल परब, किशोरी पेडणेकर यांच्यावर सोमय्या यांनी असे आरोप केले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेदेखील पत्राचाळ प्रकरणी नुकतेच तुरुंगात १०० दिवस होते.

हे ही वाचा:

आरेनंतर आदित्य यांची रेसकोर्ससाठी हाळी?

महाराष्ट्रातही समान नागरी कायद्यासाठी समिती स्थापन करा!

…मग शरद पवार कृषिमंत्री होते की आयपीएलचे कारभारी

म्हाडा टेंडरच्या वादातून कुर्ल्यात गाडीवर केला गोळीबार

मुश्रीफ यांच्या जावयाला आर्थिक लाभ मिळवून दिल्याचा आरोप आहे. त्यातूनच २० अधिकारी मुश्रीफ यांच्या घरावर धडकले.

ही कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुश्रीफ यांच्या कागल येथील घराबाहेर जमण्यास सुरुवात झाली असून ही कारवाई सूडापोटी करण्यात येत असल्याचे कार्यकर्त्यांचे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

Exit mobile version